Universal Vaccine | ‘एआय’च्या मदतीने 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन' विकसित 
विश्वसंचार

Universal Vaccine | ‘एआय’च्या मदतीने 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन' विकसित

कोरोना आणि इबोलासह हजारो व्हायरसपासून मिळणार सुरक्षा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : वैज्ञानिक क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली असून, संशोधकांनी एका अशा 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन' (सर्वसमावेशक लस) तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. ही लस भविष्यातील संभाव्य महामारीच्या व्हायरसला पसरण्यापूर्वीच रोखू शकते. केंब्रिज विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील टीमने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एक 'सुपर-अँटीजेन' डिझाईन केले आहे. ही लस एकाच फॉर्म्युलाद्वारे कोरोना आणि इबोलासारख्या धोकादायक व्हायरसच्या हजारो व्हेरियंटस्‌ विरुद्ध दीर्घकाळ सुरक्षा प्रदान करेल.

सध्याच्या कोरोना किंवा फ्लूच्या लसी विशिष्ट स्ट्रेन समोर आल्यानंतर (प्रतिक्रियात्मक पद्धतीने) बनवल्या जातात. व्हायरसमध्ये वेगाने बदल (म्युटेशन) होत असल्याने जुन्या लसींचा प्रभाव कमी होतो आणि बूस्टर डोस द्यावा लागतो. मात्र, हे नवीन एआय तंत्रज्ञान व्हायरस म्युटेट होण्यापूर्वीच त्यावर मात करण्यास सक्षम असल्याने याला 'फ्युचर प्रुफ' (भविष्यासाठी सुरक्षित) म्हटले जात आहे. 'जर्नल ऑफ इन्फेक्शन'मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या मानवी चाचणीच्या (फेज-१) निकालांनुसार, ३९ स्वयंसेवकांवर केलेली ही चाचणी पूर्णपणे सुरक्षित आणि यशस्वी ठरली आहे. या लसीने प्राण्यांमधून मानवात पसरू शकणाऱ्या संभाव्य व्हायरसविरुद्धही शरीरात मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली आहे.

इबोलाचा वाढता धोका

सध्या युगांडा आणि काँगोमध्ये इबोलाच्या नव्या उद्रेकामुळे हजारो लोक बाधित झाले असून, सुमारे २६० जणांचा मृत्यू झाला आहे. इबोला हा अत्यंत घातक संसर्ग असून, यात अंतर्गत रक्तस्त्राव आणि अवयव निकामी होतात. याचा मृत्यूदर ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. सध्या या विशिष्ट स्ट्रेनवर कोणतीही मान्यताप्राप्त लस उपलब्ध नसल्याने चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, ही 'युनिव्हर्सल व्हॅक्सीन' भविष्यात सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध झाल्यास लाखो लोकांचे प्राण वाचू शकतील, लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. आता अधिक व्यापक लोकसंख्येवर याची फेज-२ चाचणी घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT