Universal kidney transplant | युनिव्हर्सल किडनीमुळे रक्ताच्या गटाचे बंधन संपणार 
विश्वसंचार

Universal kidney transplant | युनिव्हर्सल किडनीमुळे रक्ताच्या गटाचे बंधन संपणार

पुढारी वृत्तसेवा

लंडन/व्हँकुव्हर : अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. रक्ताचा गट (ब्लड गु्रप) जुळत नसल्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करणार्‍या रुग्णांसाठी आता युनिव्हर्सल किडनी हे वरदान ठरणार आहे. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील डॉ. विदर आणि त्यांच्या टीमने केलेल्या या संशोधनामुळे आता कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला कोणत्याही रक्तगटाची किडनी बसवणे शक्य होणार आहे.

संशोधन नक्की काय आहे?

प्रत्यारोपणामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे रक्तातील अँटिबॉडीज्. जर रुग्णाचा रक्तगट आणि दात्याचा रक्तगट जुळला नाही, तर शरीर त्या अवयवाला नाकारते. शास्त्रज्ञांनी एका विशेष एंझाईमचा वापर करून किडनीच्या पेशींवरील रक्ताचे गट दर्शवणारे रेणू (अँटिजेन) काढून टाकले आहेत. यामुळे ती किडनी तांत्रिकद़ृष्ट्या ओ पॉझिटिव्ह रक्तासारखी म्हणजेच युनिव्हर्सल बनली आहे. या युनिव्हर्सल किडनीची प्राण्यांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीत असे दिसून आले की, यामुळे प्रत्यारोपण सुलभ होते. ‘हे संशोधन रुग्णांच्या दीर्घकालीन आरोग्यात सुधारणा करण्यासाठी मोलाचे ठरेल,’ असे डॉ. विदर यांनी सांगितले.

प्रयोगादरम्यान, तिसर्‍या दिवशी किडनी पुन्हा मूळ रक्तगटाचे गुणधर्म दाखवू लागली, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीने थोडा विरोध केला. मात्र, हा विरोध अपेक्षेपेक्षा कमी होता. संशोधक आता यावर काम करत असून, ही किडनी शरीरात कायमस्वरूपी कशी टिकेल, याचे परीक्षण करत आहेत. भारतासारख्या देशात, जिथे किडनी दात्यांची कमतरता आहे आणि रक्ताचा गट न जुळल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडतात, तिथे हे तंत्रज्ञान क्रांती घडवू शकते. यामुळे वेटिंग लिस्ट कमी होईल आणि अधिक रुग्णांचे प्राण वाचतील. ‘अनेक वर्षांचे मूलभूत विज्ञान जेव्हा प्रत्यक्ष रुग्णसेवेशी जोडले जाते, तेव्हा असे निकाल मिळतात. हे आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते,’ असे डॉ. विदर यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT