लंडन : जगात अनेक ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती दिसून येतात. आशियाई देशांबद्दल बोलायचे झाल्यास जपान आणि कोरियामध्ये नवीन वर्षाची विशेष चमक दिसून येते. या दोन्ही देशांमध्ये घंटा वाजवून नववर्षाचे स्वागत केले जाते. तेही एक-दोनदा नाही तर 108 वेळा. होय, येथे नवीन वर्षाच्या दिवशी 108 वेळा घंटा वाजवणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र लोक घंटा वाजवताना दिसतात.
नेदरलँडमध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत थोडी अनोखी आहे. यानिमित्ताने ॲमस्टरडॅम शहरात एक विशेष चकाकी पाहायला मिळते. येथे नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत खूप खास आहे. या दिवशी नवीन वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी लोक पहाटे समुद्राच्या पाण्यात डुंबतात. त्यासाठी ते श्वेनिंजन बीचवर जमतात. असे मानले जाते की समुद्रात डुबकी घेतल्याने नवीन वर्ष चांगले जाते.
अमेरिकेत, टाईम स्क्वेअरवर नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. नवीन वर्षाच्या काऊंटडाऊनमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात. या निमित्ताने टाईम्स स्क्वेअरजवळ लोक जमतात आणि सर्वांच्या नजरा झेंड्याच्या खांबावर खिळलेल्या असतात. येथून एक चेंडू खाली पडतो, जो काऊंटडाऊनचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच अमेरिकन शहरातील लोक उंचावरून वस्तू खाली फेकतात, जसे की कलिंगड. स्पेनमधील नवीन वर्ष माद्रिद शहरात किंवा कॅनरी बेटांवर साजरे केले जाते. स्पेनच्या नवीन वर्षाच्या परंपरेनुसार 12 द्राक्षे खाल्ली जातात. रात्री 12 वाजता लोक 12 महिन्यांच्या नावे 12 द्राक्षे खातात. यावेळी 12 घंटा वाजवल्या जातात आणि प्रत्येक घंटेसोबत एक द्राक्ष खाल्ला जातो. असे केल्याने सुखसमृद्धी येते अशी धारणा आहे म्हणूनच त्यांना ‘नशिबाची द्राक्षे’ असेही म्हणतात. या प्रथेचे पालन करून लोक नाचत गात नवीन वर्षाचे स्वागत करतात.