झेजियांग (चीन) : चीनच्या झेजियांग प्रांतातील शेनक्सियानजु भागात एक असा पूल आहे, जो पाहताच लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. जमिनीपासून तब्बल 140 मीटर उंचीवर हवेत लटकलेला हा पूल म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगचा एक विलोभनीय नमुना आहे. हा पूल केवळ चालण्यासाठीच नाही, तर थरारक अनुभवासाठी आणि छायाचित्रणासाठी जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे.
शेनक्सियानजु हे क्षेत्र ज्वालामुखीपासून तयार झालेल्या खडकांसाठी, धबधब्यांसाठी आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे. याच नैसर्गिक सौंदर्यात एका दरीवर, दोन पर्वतकड्यांच्या जोडत ‘रुई बि—ज’ उभा आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट हे युनचांग यांनी याचे डिझाईन केले आहे. या पुलाचा आकार चीनमधील पारंपरिक ‘जेड रुई’ सारखा आहे, ज्याला चीनमध्ये सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. खालून पाहिल्यास हा पूल जणू काही ढगांमध्ये तरंगत असल्याचा भास होतो. रुई पुलाची लांबी सुमारे 100 मीटर असून तो तीन स्तरांमध्ये विभागलेला आहे.
पुलाच्या खालच्या स्तरावर पारदर्शक काचेचा रस्ता बनवण्यात आला आहे. 140 मीटर उंचीवर काचेवरून चालताना खाली पाहिल्यास खोल दरी दिसते. प्रत्येक पाऊल टाकताना पर्यटकांच्या मनात धडधड निर्माण करणारा हा अनुभव अत्यंत थरारक असतो. वरचा स्तर धातूचा बनवलेला आहे, तर खालच्या स्तरावर अत्यंत मजबूत काचेचा वापर करण्यात आला आहे. हा पूल जरी दिसायला धोकादायक वाटत असला, तरी पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. पुलाची मुख्य रचना स्टीलची असून त्याला हाय-स्ट्रेन्थ स्टील केबल्सचा आधार देण्यात आला आहे.
पुलावर वापरलेले काचेचे पॅनेल प्रेशर-टेस्टेड असून ते जागतिक सुरक्षा मानकांनुसार बसवण्यात आले आहेत. 2020 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलावर आतापर्यंत लाखो पर्यटकांनी भेट दिली आहे. कोणत्याही अपघाताशिवाय हा पूल रोमांच आणि सुरक्षिततेचे उत्तम उदाहरण ठरला आहे. शेनक्सियानजु शहरापासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण आता पर्यटकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये अव्वल स्थानी आहे.