sleep competition | सर्वात गाढ झोपण्याची अनोखी स्पर्धा 
विश्वसंचार

sleep competition | सर्वात गाढ झोपण्याची अनोखी स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

सेऊल : आजच्या धावपळीच्या युगात पैसा कमवण्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस कष्ट करत आहे; पण जर कुणी तुम्हाला सांगितले की, काम सोडा आणि फक्त शांत झोप घ्या, त्याबद्दल तुम्हाला बक्षीस आणि पैसे मिळतील, तर तुम्हाला कदाचित हा विनोद वाटेल; पण दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये अशीच एक अनोखी स्पर्धा पार पडली. तिथे आयोजित करण्यात आलेल्या या ‘पावर नॅप’ स्पर्धेत लोक कामाचा ताण विसरून शांत झोप घेण्यासाठी एकत्र जमले होते. धावपळीच्या जीवनात झोप आणि मानसिक शांततेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सध्या सोशल मीडियावर या ‘झोपण्याच्या शर्यतीचे’ फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

सेऊलमधील ‘हान’ नदीच्या काठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्पर्धकांना कोणतेही कठीण काम दिले नव्हते, तर फक्त शांतपणे झोपायचे होते. विशेष म्हणजे, सहभागी झालेले बहुतांश लोक आधीच खूप थकलेले होते, जेणेकरून त्यांना पटकन आणि गाढ झोप लागेल. कार्यक्रमात अधिक रंगत आणण्यासाठी स्पर्धकांना विचित्र कपडे घालून येण्यास सांगण्यात आले होते. कोणी राजाचा वेष परिधान केला होता, तर कोणी प्राण्यांचे कपडे घातले होते. एक महिला तर ‘कोआला’ या प्राण्याचे रूप घेऊन आली होती. कारण, कोआला हा प्राणी त्याच्या गाढ झोपेसाठी ओळखला जातो. आता प्रश्न असा पडतो की, झोपेत हार-जीत कशी ठरली? तर या स्पर्धेत फक्त झोपणे पुरेसे नव्हते.

जो सर्वात शांत आणि गाढ झोपला, त्याला विजेता घोषित करण्यात आले. यासाठी आयोजकांनी स्पर्धकांच्या हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण केले. ज्याच्या हृदयाचे ठोके सर्वात स्थिर आणि जो सर्वात जास्त रिलॅक्स होता, तो विजेता ठरला. या स्पर्धेत एका वृद्ध व्यक्तीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसर्‍या क्रमांकावर 37 वर्षांचा एक ऑफिस कर्मचारी राहिला, जो रात्रीच्या पाळीत काम करून खूप थकलेला होता. दक्षिण कोरिया हा जगातील अशा देशांपैकी एक आहे, जिथे लोक सर्वात कमी झोप घेतात.

कामाचा ताण, अभ्यासाचा दबाव आणि वेगवान जीवनशैली यामुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. याच समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नसून तो एक सामाजिक संदेश आहे. आजच्या काळात लोक कामाच्या नादात झोपेकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. काम जितके महत्त्वाचे आहे, तितकीच विश्रांतीही गरजेची आहे, हाच संदेश यातून देण्यात आला. सियोलमध्ये ही स्पर्धा आता दरवर्षी होत असून, त्यात सहभागी होण्यासाठी हजारो लोक नोंदणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT