Deep sea creature | विषारी वातावरणात जगणारा खोल समुद्रातील अनोखा जीव Pudhari File Photo
विश्वसंचार

Deep sea creature | विषारी वातावरणात जगणारा खोल समुद्रातील अनोखा जीव

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खोल समुद्रातील उष्ण जलस्रोताजवळ राहणार्‍या एका अळीच्या प्रजातीने (worm species) जगण्यासाठी एक आश्चर्यकारक युक्ती विकसित केली आहे. ही अळी आर्सेनिक आणि सल्फाईड या दोन अत्यंत विषारी पदार्थांना आपल्या पेशींमध्ये एकत्र करून एक कमी हानिकारक खनिज तयार करते. या अनोख्या शोधाबद्दलची माहिती चीनच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉलॉजी, सीएएस’ येथील चाओलुंग ली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘पीएलओएस बायोलॉजी’ या खुल्या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध केली आहे.

‘पॅरल्व्हिनेला हेस्लेरी’ (Paralvinella hessleri) नावाची ही प्रजाती पश्चिम पॅसिफिक महासागरातील उष्ण जलस्रोताच्या सर्वात गरम भागांमध्ये राहू शकणारा एकमेव जीव आहे. या स्रोतांमधून बाहेर पडणार्‍या गरम, खनिज-समृद्ध पाण्यात मोठ्या प्रमाणात सल्फाईड आणि आर्सेनिक असते. या अळीच्या शरीरात आर्सेनिक जमा होत जाते, काही प्रकरणांमध्ये ते तिच्या एकूण वजनाच्या 1% पेक्षा जास्त असते. ‘पी. हेस्लेरी’ या विषारी वातावरणात कशी जगते, हे शोधण्यासाठी ली यांच्या टीमने प्रगत सूक्ष्मदर्शकाचा वापर केला. त्याचबरोबर डीएनए, प्रोटिन आणि रासायनिक विश्लेषणही केले.

त्यांच्या संशोधनातून एक पूर्णपणे नवीन विषारीकरण प्रक्रिया (detoxification process) उघड झाली. ही अळी आर्सेनिकचे कण आपल्या त्वचेच्या पेशींमध्ये साठवते, जिथे ते उष्ण जल स्रोतातील सल्फाईडसोबत मिसळून ‘ऑर्पिमेंट’ (orpiment) नावाचे चमकदार पिवळ्या रंगाचे खनिज तयार करतात. संशोधकांनी या असामान्य प्रक्रियेला ‘विषाशी लढण्यासाठी विषाचाच वापर’ असे वर्णन केले आहे. ही युक्ती त्या अळीला अशा वातावरणात जगू देते, जिथे इतर कोणत्याही प्राण्यासाठी जगणे शक्य नाही. इतर काही अभ्यासांमधून असेही सूचित होते की पश्चिम पॅसिफिकमधील काही संबंधित अळी प्रजाती आणि काही गोगलगायींमध्येही मोठ्या प्रमाणात आर्सेनिक जमा होते आणि त्यादेखील अशाच प्रकारच्या पद्धतीचा वापर करत असतील.

सहलेखक डॉ. हाओ वांग म्हणाले, ‘हा माझा पहिला खोल समुद्रातील शोध मोहीम अनुभव होता. आर.ओ.व्ही. (ROV) मॉनिटरवर मी जे काही पाहिले, ते पाहून मी थक्क झालो. चमकदार पिवळ्या रंगाच्या ‘पॅरल्व्हिनेला हेस्लेरी’ अळ्या मी यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगळ्या होत्या आणि पांढर्‍या बायोफिल्म व गडद उष्ण जलस्रोताच्या पार्श्वभूमीवर त्या उठून दिसत होत्या. अशा अत्यंत विषारी वातावरणात कोणताही प्राणी जगू शकतो, यावर विश्वास ठेवणे कठीण होते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT