अंटार्क्टिकाजवळ समुद्रात सापडले अनोखे जीव 
विश्वसंचार

अंटार्क्टिकाजवळ समुद्रात सापडले अनोखे जीव

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा ः अंटार्क्टिकाच्या किनार्‍यालगत समुद्राच्या तळाशी वैज्ञानिकांनी काही असे जीव शोधून काढले आहेत, जे अगदी विज्ञानकथांमधून बाहेर पडल्यासारखे वाटतात. गुलाबी आणि फुगारलेल्या ‘सी पिग्स’, हाताएवढे समुद्री कोळी आणि नाजूक समुद्री फुलपाखरं, अशा असंख्य विचित्र जीवजंतूंचा साठा ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. हे संशोधन आरएसव्ही नुयिना या बर्फफोड जहाजावरून चालू आहे, जे डेनमन हिमनदीकडे जाणार्‍या 60 दिवसांच्या मोहिमेवर आहे.

या विचित्र जीवांपैकी काही प्रजाती आजवर विज्ञानासाठी अज्ञात असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. जेम्स कुक विद्यापीठातील सागरी जीवशास्त्राचे प्राध्यापक जान स्ट्रगनेल यांनी म्हटले आहे की, आम्हाला विविध प्रकारचे सागरी जीव मिळाले असून, त्यामध्ये काही शास्त्रासाठी नवीन प्रजातीही असू शकतात. या मोहिमेचा उद्देश डेनमन हिमनदीवर वाढत्या समुद्री तापमानाचा परिणाम अभ्यासणे हा आहे. ही हिमनदी ऑस्ट्रेलियाच्या सुमारे 5,000 किलोमीटर दक्षिणेस आहे आणि 1996 ते 2018 दरम्यान ती सुमारे 5 किलोमीटर माघारी सरकली आहे. ही पूर्व अंटार्क्टिकातील सर्वात वेगाने वितळणारी हिमनदी मानली जाते. मोहिमेदरम्यान संशोधकांनी समुद्राच्या तळाशी विविध प्रकारचे जीव शोधून काढले. त्यामध्ये सर्वात लक्षवेधी होता ‘सी पिग’. हा प्रकार समुद्री काकड्याचा असून, याची लांबी 4 ते 15 सेंटिमीटरपर्यंत असते. त्यांचे शरीर फुगलेले व मऊसर असते आणि त्यांना लहान जाडजूड पाय असतात, त्यामुळे ते डुकरांसारखे दिसतात. हे प्राणी 1 ते 6 कि.मी. खोलीवर राहतात व वरून खाली पडणार्‍या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात, ज्याला ‘मरीन स्नो’ असे म्हटले जाते. संशोधकांना मोठ्या आकाराचे समुद्री कोळीही मिळाले, जे हाताएवढे मोठे आहेत. तसेच जेवणाच्या ताटाएवढे मोठे तारामासा (सी स्टार्स) देखील सापडले. समुद्री कोळी हे खर्‍या कोळ्यांच्या वर्गात मोडत नाहीत, तर ते खेकड्यांसारख्या जलचर प्रजातींच्या जवळचे नातेवाईक आहेत. त्यांचे आठ लांबट पाय आणि छोटं शरीर असतं. काही प्रजातींच्या पायांचा फैलाव 51 सेंटिमीटरपर्यंत जाऊ शकतो. जगभरात 1,300 पेक्षा अधिक प्रजातींचे समुद्री कोळी आढळतात आणि ते 4 कि.मी. खोल समुद्रात विविध वातावरणात सापडतात. त्यांच्या शरीराची रचना इतकी लहान असते की, काही अंगप्रत्यंग जसे की पचनसंस्था व प्रजननसंस्था त्यांच्या पायांमध्ये असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT