वॉशिंग्टन : समुद्राच्या अथांग आणि अंधार्या खोलीत राहणार्या एका रहस्यमयी जीवाबाबत शास्त्रज्ञांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ‘एलिसिला जिंगेंटिया’ (Alicella gigantea) असे या जीवाचे नाव असून, त्याला दीर्घकाळापासून अत्यंत दुर्मीळ मानले जात होते. मात्र, नव्या संशोधनानुसार हा जीव दुर्मीळ नसून, तो समुद्राच्या अत्यंत खोल भागात मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.
‘एलिसिला जिंगेंटिया’ हा साधारण 13.4 इंच लांबीचा जीव असून तो दिसायला एखाद्या मोठ्या कोळंबीसारखा (Shrimp) दिसतो. याला सामान्य भाषेत ‘एम्फीपोड’ असेही म्हणतात. शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की, हा जीव समुद्रसपाटीपासून 17,400 फूट ते 29,300 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त खोलीवर वास्तव्य करतो. पृथ्वीवरील ही अशी ठिकाणे आहेत, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि तापमान गोठवणारे असते.
‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने जुन्या सर्व समजांना छेद दिला आहे. हा जीव केवळ एका विशिष्ट भागात मर्यादित नसून जगातील विविध महासागरांमध्ये पसरलेला आहे. विशेष म्हणजे, भौगोलिकद़ृष्ट्या एकमेकांपासून हजारो मैल दूर असूनही, या जीवांच्या जनुकांमध्ये कमालीचे साम्य आहे. हे त्यांच्या लवचिकतेचे आणि जगण्याच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण असल्याचे तज्ज्ञ मानतात.
समुद्राच्या तळाशी अन्नाचा प्रचंड अभाव असतो. अशावेळी हे जीव वरून पडणारे सेंद्रिय पदार्थ आणि मृत अवशेषांवर जगतात. अन्नाशिवाय दीर्घकाळ राहण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात विकसित झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डॉ. पेज मारोनी यांनी जगभरातील खोल समुद्रातील मोहिमांच्या आधारे हा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, हा जीव दुर्मीळ वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाकडे इतक्या खोलीवर जाऊन संशोधन करण्याची पुरेशी साधने उपलब्ध नव्हती. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे या ‘एलियन’ सद़ृश जीवाचे रहस्य उलगडण्यास मदत झाली आहे.