मेक्सिको सिटी : मेक्सिकोमधील चिहुआहुआ प्रदेशातील नायका खाणीच्या सुमारे ३०० मीटर (जवळपास ९८० फूट) खाली वसलेली ‘जायंट क्रिस्टल केव्ह’ ही निसर्गाच्या अद्भुत आणि अवाक् करणाऱ्या चमत्कारांपैकी एक मानली जाते. या गुहेमध्ये आढळणारे अवाढव्य, स्फटिकांसारखे दगड आणि त्यांची भव्यता पाहून जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत.
या गुहेचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे आढळणारे जिप्समचे प्रचंड मोठे स्फटिक. यातील काही स्फटिकांची लांबी तब्बल ३९ फूट (१२ मीटर), व्यास ४ मीटर आणि वजन ५० टनांहून अधिक आहे. हे स्फटिक मानवी इतिहासात सापडलेल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक स्फटिकांपैकी एक मानले जातात. हे दृश्य एखाद्या काल्पनिक जगासारखे किंवा सायन्स-फिक्शन चित्रपटासारखे दिसते. दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असली, तरी या गुहेत प्रवेश करणे जीवावर बेतू शकते. या गुहेतील हवामान अतिशय तीव्र आणि घातक आहे. गुहेच्या आतील तापमान ५० अंश सेल्सिअस ते ५८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.
येथील आर्द्रता ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत असते. या उष्ण आणि दमट वातावरणामुळे विशेष संरक्षणात्मक सूट आणि ऑक्सिजन उपकरणांशिवाय माणूस या गुहेत १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. जास्त वेळ राहिल्यास फुफ्फुसांमध्ये पाणी साचून गुदमरण्याचा धोका असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार, ही गुहा लाखो वर्षांपूर्वी भूगर्भातील मॅग्मा (तप्त द्रव) आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या गरम पाण्याने भरलेली होती. हजारो वर्षे या पाण्यातील जिप्समचे तापमान ५० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहिल्यामुळे या विशाल स्फटिकांची हळूहळू निर्मिती झाली. जेव्हा खाणकामासाठी येथील पाणी उपसण्यात आले, तेव्हा या गुहेचा शोध लागला. सध्या या खाणीतील पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्याने गुहेत पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी भरू लागले आहे. यामुळे गुहेतील स्फटिकांचे रक्षण होत असले, तरी मानवासाठी आता तेथे प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले आहे.