पॅरिस : विमानाने प्रवास करणे थोडे खर्चिक असले तरी देखील यामुळे माणसाचा खूप वेळ वाचतो. ज्यामुळे बहुतांश लोक विमानाने प्रवास करणे पसंत करतात. आपल्याला एखाद्या देशात जायचे असेल तर त्या देशातील विमानतळावर उतरावे लागते. पण, एक असेही ठिकाण आहे जिथे उतरल्यानंतर आपण एक नाही तर तीन देशात जाऊ शकतो.
या विमानतळाचे वैशिष्ट्य असे आहे की, येथे उतरताच आपल्याला तीन वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते. या विमानतळावरून बाहेर आल्यानंतर एका दिशेला तुम्हाला स्वित्झर्लंड आणि दुसर्या दिशेला फ्रान्सला जाता येईल आणि या विमानतळाजवळ जर्मनीचेही काही भाग आहेत, ज्यामुळे हा एअरपोर्ट तीन देशांना जोडणारा एक अद्वितीय केंद्रस्थळ म्हणून नावारूपास आले आहे आणि हे विमानतळ आहे बेसल-मलहाउस-फ्रीबर्ग विमानतळ.
सुरुवातीला 1930 मध्ये या विमानतळाचे काम सुरू झाले होते. पण, दुसर्या महायुद्धामुळे त्यात व्यत्यय आला. नंतर 1946 पासून पुन्हा या प्रकल्पाला गती मिळाली आणि तो या तीन देशांमधील सहकार्याचे प्रतीक बनला. फ्रान्सने आपली जमीन दिली, तर स्वित्झर्लंडने भरपूर आर्थिक सहकार्य केले. याच विमानतळावरून प्रवाशांना स्विस फ्रँक किंवा युरोमधून व्यवहार करण्याची सोय दिली जाते. त्यामुळे, प्रवासी आपल्या पसंतीनुसार आणि त्याच देशाच्या नियमांनुसार आपला व्यवहार करू शकतात. यामुळे हा विमानतळ जगभरातील अनेक लोकांसाठी अतिशय सुविधाजनक ठरत आला आहे.