अंकारा : तुर्कियेतील एका अश्मयुगीन ऐतिहासिक स्थळावर उत्खनन करणाऱ्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका बिबट्याच्या पाठीवर बसलेल्या मानवाची अत्यंत दुर्मीळ व अनोखी कलाकृती सापडली आहे. तज्ज्ञांच्या मते, ११,००० वर्षांपूर्वीचा हा पुतळा त्या काळातील संस्कृतीचा पुरुषाची क्षमता आणि पुरुषत्वाविषयी असलेला विशेष दृष्टिकोन दर्शवतो.
तुर्कियेच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हा पुतळा या उन्हाळ्यात दक्षिण तुर्कियेतील ‘कराहान टेपे’ या नवअश्मयुगीन स्थळावर उत्खननादरम्यान सापडला. तुर्कियेचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमेट नुरी एरसोय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २८ इंच (७० सेंटीमीटर) उंच असलेला हा पुतळा ‘यापूर्वी कधीही न पाहिलेल्या एका नव्या शैलीत’ साकारण्यात आला आहे. सुमारे १० फूट (३ मीटर) व्यास असलेल्या एका वर्तुळाकार रचनेच्या भिंतीला लागून असलेल्या व्यासपीठावर संशोधकांना हा पुतळा आढळला. कराहान टेपे हे जगातील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या गावांपैकी एक आहे.
तुर्कियेच्या ‘उर्फा’ प्रांतात इसवी सन पूर्व ९७५० च्या सुमारास याची उभारणी झाली होती. याच भागात ‘गोबेकली टेपे’ सारख्या इतर प्राचीन मानवी वस्त्याही वसलेल्या होत्या. या ऐतिहासिक स्थळांवर पुरुष आणि रानटी पशूंवर आधारित अनेक गूढ कलाकृती सापडल्या आहेत. २०२३ मध्ये कराहान टेपे येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका पुरुषाचा ११,००० वर्षे जुना प्रचंड पुतळा सापडला होता, जो बहुदा त्यांच्या मुख्य पूर्वजाचे प्रतिनिधित्व करतो. १९९३ मध्ये गोबेकली टेपेजवळ ‘उर्फा मॅन’ नावाचा माणसाचा आणखी एक मानवाकृती पुतळा आढळला होता.
२०२२ मध्ये उर्फा परिसरातील ‘सायबुरच’ येथे दोन बिबटे, एक बैल आणि एक पुरुष यांचे कोरीव शिल्प सापडले होते. जर्मन आर्किओलॉजिकल इन्स्टिट्यूटचे नवअश्मयुग तज्ज्ञ डॉ. जेन्स नॉट्रॉफ यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत मानवाच्या पाठीवर प्राणी असलेला पुतळा पाहायला मिळाला होता. मात्र, नव्याने सापडलेली ही मूर्ती मानवाच्या पाठीवर प्राणी असण्याऐवजी प्राण्यांच्या पाठीवर मानव बसल्याचे दाखवणारे ‘उलट रूप’ दिसते.’ यापूर्वी कराहान टेपे येथे पाठीवर बिबट्या असलेल्या मानवाचा पुतळा सापडला होता, जो सध्या ‘शान्लिउर्फा संग्रहालयात’ ठेवण्यात आला आहे.