वॉशिंग्टन ः पॅसिफिक महासागराच्या तळाशी सापडलेल्या नवीन ज्वालामुखींच्या मालिकेमुळे संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हे ज्वालामुखी हवाईच्या दक्षिणेस सुमारे 4,700 किमी (2,900 मैल) अंतरावर असलेल्या कुक बेटांजवळ शोधले गेले आहेत. संशोधकांच्या मते, जर हे ज्वालामुखी सक्रिय असतील, तर त्यातून निर्माण होणार्या उष्णतेमुळे एक अनोखी आणि रोमांचक सागरी परिसंस्था विकसित होण्याची शक्यता आहे.
हा शोध समुद्रतळ नकाशांकन मोहिमेदरम्यान लागला. सीबेड मिनरल्स अथॉरिटी (SBMA) च्या म्हणण्यानुसार, ‘सध्या तरी आम्हाला कोणतेही स्पष्ट ज्वालामुखी सक्रियतेचे संकेत सापडले नाहीत. मात्र, अद्याप कोणीही समुद्रतळाचा बारकाईने अभ्यास केलेला नाही किंवा तेथील नमुने गोळा केलेले नाहीत. आमच्या संशोधनातून तयार होणारा नवीन समुद्रतळ नकाशा भविष्यातील शास्त्रज्ञांना योग्य ठिकाणी उत्खनन करण्यास मदत करेल. ‘कुक बेटांचा समूह फ्रेंच पॉलिनेशिया आणि अमेरिकन सामोआच्या दरम्यान दक्षिण पॅसिफिकमध्ये स्थित आहे. हवाई बेटांच्या निर्मितीप्रमाणेच, कुक बेटांचीदेखील निर्मिती पॅसिफिक प्लेट पृथ्वीच्या अंतर्भागातील मॅग्मा हॉटस्पॉटवर सरकत गेल्यामुळे झाली. मॅग्मा हॉटस्पॉट म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागातील एक विशिष्ट क्षेत्र, जिथे अत्यंत उष्ण दगड जमिनीकडे वर सरकत असतो आणि ज्वालामुखी निर्माण होतात.
मॅग्मा हॉटस्पॉट प्लेटच्या मध्यभागी स्थिर राहतो, तर त्या वरची प्लेट हळूहळू हलत राहते. हॉटस्पॉटमधून वर येणार्या गरम मॅग्मामुळे समुद्रतळावर ज्वालामुखींच्या स्फोट होतात. या ज्वालामुखींच्या वारंवार उद्रेकांमुळे सागरी ज्वालामुखी तयार होतो, जो पुढे वाढत समुद्रपृष्ठभागाच्या वर येऊन बेट तयार करू शकतो. बहुतेक कुक बेटांवर प्राचीन ज्वालामुखींचे अवशेष आहेत, ज्यांचे खडक कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या आहेत. मात्र, रारोटोंगा आणि ऐटूटाकी या बेटांवर तुलनेने नवीन खडक आढळतात, कारण ही बेटं हॉटस्पॉटच्या हालचालीमुळे अलीकडच्या काळात तयार झाली आहेत. रारोटोंगा बेटावरील सर्वांत ‘तरुण’ खडक सुमारे 1.2 दशलक्ष (1.2 मिलियन) वर्षे जुने आहेत, म्हणजेच भौगोलिकद़ृष्ट्या ही नुकतीच निर्माण झालेली भूमी आहे. हा शोध भविष्यातील समुद्रगर्भीय संशोधनासाठी मोठी संधी देतो आणि सागरी परिसंस्था तसेच ज्वालामुखी क्रियाशीलतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.