Fungal Network Earth | पृथ्वीखालील बुरशीचे जाळे चक्क आकाशगंगेच्या १० टक्के भागाएवढे  
विश्वसंचार

Fungal Network Earth | पृथ्वीखालील बुरशीचे जाळे चक्क आकाशगंगेच्या १० टक्के भागाएवढे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आपल्या पृथ्वीखाली बुरशीचे एक अत्यंत विस्तीर्ण जाळे पसरलेले आहे. हे जाळे जर एका सरळ रेषेत जोडले आणि अवकाशात पसरवले, तर ते आपल्या संपूर्ण ‘मिल्की वे’ (आकाशगंगा) गॅलेक्सीच्या तब्बल १० टक्के भागाला व्यापू शकेल, असा थक्क करणारा खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे.

या भूमिगत संरचनेला ‘अर्बस्कुलर मायकोरायझल फंगल नेटवर्क’ असे म्हणतात. हे जाळे जगभरातील बहुतांश वनस्पतींशी भागीदारी करून काम करते. हे नेटवर्क वनस्पतींना जमिनीतील नायट्रोजन आणि फॉस्फरस पुरवण्याचे काम करते. त्याबदल्यात वनस्पतींकडून हे जाळे स्वतःसाठी ‘कार्बन’ मिळवते. या बुरशीजन्य नेटवर्कचा जगातील पहिला जागतिक नकाशा आता तयार करण्यात आला असून, यामुळे या गुंतागुंतीच्या जाळ्यांची घनता नेमकी कुठे जास्त आहे, हे समोर आले आहे. ‘सायन्स’ या प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात गुरुवारी (११ जून) प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, फ्लोरिडातील ‘एव्हरग्लेडस्‌’सारख्या उंच भागातील किंवा पाण्याने वेढलेल्या गवताळ प्रदेशात या जाळ्यांची घनता सर्वाधिक आहे. येथील जमिनीच्या वरच्या अवघ्या ६ इंचांच्या (१५ सेंटिमीटर) थरात जगातील एकूण बुरशीच्या बायोमासपैकी तब्बल ४० टक्के हिस्सा आढळतो.

यामुळे मानवी हस्तक्षेप न झालेले गवताळ प्रदेश हे कार्बन शोषून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासार्ह माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि ‘सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ अंडरग्राऊंड नेटवर्क्स’चे उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ जस्टिन स्टीवर्ट यांनी सांगितले की, ‘हे पृथ्वीवरील बुरशीचे सर्वात दाट जंगल आहे आणि ते नैसर्गिक गवताळ प्रदेशांच्या खाली लपलेले आहे. या शोधामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी कशा प्रकारे पसरलेली आहे, हे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलत आहे.’ झाडे तोडण्यापेक्षा गवत उपटून टाकणे किंवा नष्ट करणे खूप सोपे असल्याने मानवाकडून नैसर्गिक गवताळ प्रदेश खूप वेगाने नष्ट केले जात आहेत. यावर चिंता व्यक्त करत स्टीवर्ट म्हणाले, ‘मला आशा आहे की, या शोधामुळे या जमिनीखालील जगाच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरू होईल. कारण, हे नैसर्गिक गवताळ प्रदेश अत्यंत वेगाने नष्ट होत चालले आहेत आणि त्यांना वाचवणे आता काळाची गरज आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT