लॉस एंजेलिस : अमेरिकेत लॉस एंजेलिसच्या आकाशात एका अज्ञात उडत्या वस्तूचे (युफो) स्पष्ट आणि आश्चर्यकारक फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे अमेरिकेच्या मोठ्या शहरांवर काय उडत आहे याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. लॉस एंजेलिसमधील दोन रहिवासी त्यांच्या बाल्कनीतून शहराकडे पाहत असताना, त्यांना 28 ऑगस्ट रोजी एक काळ्या रंगाची, ‘ V’ आकाराची, दिव्यांनी भरलेली वस्तू हळू हळू उडताना दिसली.
हे दृश्य सुमारे 25 मिनिटे चालू होते. ही UFO दक्षिणेकडे उडत होती आणि रात्री 11.38 वाजता (स्थानिक वेळेनुसार) दिसेनाशी झाली. या दोन्ही साक्षीदारांनी त्यांच्या मोबाईल फोनच्या कॅमेर्यातून स्पष्ट फोटो आणि व्हिडीओ काढले. व्हिडीओमध्ये झूम केल्यावर, त्या ‘युफो’ च्या पृष्ठभागावर नऊ पांढरे दिवे स्पष्टपणे दिसले. या स्पष्ट द़ृश्यांमुळे, अमेरिकेच्या मोठ्या शहरांच्या आकाशात उडणार्या वस्तूंबद्दल पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.
युफो संशोधक आणि चित्रपट निर्माता मार्क क्रिस्टोफर ली यांनी सांगितले की, त्यांचा विश्वास आहे की ती वस्तू परग्रहावरील नाही. ते म्हणाले, ‘ती अमेरिकेच्या सरकारसाठी किंवा इतर कोणत्याही जागतिक महाशक्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणारी एक मानवरहित ड्रोन असण्याची शक्यता आहे. मात्र, या द़ृश्याच्या आणि ब्रिटनमधील अनेक प्रसिद्ध यूफो घटनांच्या त्यांच्या विश्लेषणानंतर ली यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
ते म्हणाले की, ‘अमेरिकेच्या लष्कराने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे 2025 मध्येही फक्त विज्ञान कल्पनेमध्ये असल्याचे लोकांना वाटते.’ ली यांनी स्पष्ट केले, ‘माझा असा विश्वास आहे की, अनेक प्रसिद्ध युफो घटनांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान हे अत्यंत प्रगत आहे, जे आपल्या कल्पनेपेक्षा 30 ते 40 वर्षे पुढे आहे.’ ती वस्तू कुठून आली, हे महत्त्वाचे नसले तरी, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेच्या आकाशात ‘V’ आकाराच्या किंवा शेवरॉन (chevron) आकाराच्या वस्तू उडताना दिसल्याच्या अनेक घटनांपैकी ही सर्वात ताजी घटना आहे.