UFO mystery | ‘युफो’ संदर्भातील ‘त्या’ घटनांमागील सत्य गुलदस्त्यातच! 
विश्वसंचार

UFO mystery | ‘युफो’ संदर्भातील ‘त्या’ घटनांमागील सत्य गुलदस्त्यातच!

अमेरिकेकडून 80 वर्षांमधील 162 दस्तावेज, फोटो उघड

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटॅगॉन) युएफओ आणि यूएपी (UAP - Unidentified Anomalous Phenomena) संदर्भातील तब्बल 162 गुप्त दस्तावेज, फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक केले आहेत. यामध्ये गेल्या 80 वर्षांत झालेल्या कथित परग्रहवासीयांच्या आणि उडत्या तबकड्यांच्या दर्शनाचा तपशील समाविष्ट आहे. 8 मे रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती खुली करण्यात आली आहे. मात्र या गूढ गोष्टींमागील सत्य गुलदस्त्यातच असून त्यामागील ठोस कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हे दस्तावेज सन 1947 पासूनचे असून, यात संरक्षण मंत्रालय, एफबीआय आणि नासा यांसारख्या नामांकित सरकारी संस्थांच्या अहवालांचा समावेश आहे. नासाच्या दस्तऐवजांमध्ये ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी अवकाशात पाहिलेल्या काही रहस्यमय वस्तूंचे फोटो, ऑडिओ फाईल्स आणि त्यांच्या संभाषणांचे लिखित उतारे आहेत. जरी हे दस्तावेज पहिल्यांदाच अधिकृतपणे डि-क्लासिफाय म्हणजेच गुप्ततेच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात आले असले, तरी यातील बहुतांश माहिती कित्येक दशकांपासून अप्रत्यक्षपणे उपलब्ध होती आणि त्यातून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संकेतस्थळावर स्पष्ट केले की, ‘येथे जतन करण्यात आलेली माहिती अशा प्रकरणांची आहे ज्यांची उकल झालेली नाही. म्हणजेच, प्रत्यक्षात दिसलेली ती गोष्ट नेमकी काय होती, याबद्दल सरकार कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाही. पुरेशा डाटाच्या अभावामुळे किंवा खराब गुणवत्तेमुळे असे घडले आहे.‘डाटा अत्यंत अस्पष्ट असल्यामुळे या अहवालांमध्ये परग्रहावरील सजीव सृष्टी किंवा एलियन्सच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.

या नवीन फाईल्स प्रसिद्ध झाल्यानंतर नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी या उपक्रमाला पाठिंबा देणारे एक पत्रक जारी केले आहे. याव्यतिरिक्त नासाने यावर थेट कोणतीही मोठी टिप्पणी केलेली नाही. तथापि, नासाची या विषयावरील अधिकृत भूमिका आधीसारखीच स्पष्ट आहे. नासाच्या मते, आकाशात दिसणार्‍या या अज्ञात आणि रहस्यमय घटना पूर्णपणे खर्‍या आहेत, परंतु त्यांचा परग्रहवासीयांशी किंवा एलियन्सशी कोणताही संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT