नवी दिल्ली : आजच्या काळात मधुमेह किंवा डायबिटीस हा केवळ वृद्धांचा आजार राहिलेला नाही. आता २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही हा आजार वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. टाईप-२ डायबिटीसची सुरुवात अत्यंत संथपणे होते आणि सुरुवातीला याची लक्षणे फारशी जाणवत नाहीत. मात्र, वेळेत ही लक्षणे ओळखली आणि रक्तातील साखरेची (ब्लड शुगर) तपासणी करून घेतली, तर हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो आणि गंभीर समस्यांपासून बचाव करता येतो.
तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा वॉशरूमला जात असाल किंवा रात्री झोपेतून अनेकदा उठावे लागत असेल, तर हा हाय ब्लड शुगरचा संकेत असू शकतो. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी लघवीच्या माध्यमातून ती शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे लघवीला जास्त होते. ब्लड शुगर वाढल्यास भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला सतत तहान लागल्यासारखे वाटू शकते. तसेच, अनेक लोकांना जेवल्यानंतर लगेचच भूक लागल्यासारखी वाटते. शरीर जेव्हा ऊर्जेसाठी साखरेचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. आहार किंवा व्यायामामध्ये कोणताही बदल न करता जर अचानक वजन कमी होऊ लागले, तर याकडे दुर्लक्ष करू नका.
जेव्हा शरीर ऊर्जेसाठी साखरेचा वापर करू शकत नाही, तेव्हा ते चरबी आणि स्नायू जाळू लागते, ज्यामुळे वेगाने वजन घटू लागते. अनेक कारणांमुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो. मात्र, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर हे वाढलेल्या ब्लड शुगरचे कारण असू शकते. शुगर हाय असताना शरीरातील पेशींचा वापर योग्य प्रकारे करू शकत नाहीत, ज्यामुळे ऊर्जा कमी होऊ लागते. हाय ब्लड शुगरमुळे डोळ्यांमधील द्रवाच्या पातळीत बदल होऊ शकतो, ज्यामुळे काही वेळासाठी नजर अंधुक होऊ शकते. याशिवाय, काही लोकांना वारंवार युरिनरी किंवा फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. जर तुमच्यासोबत असे विनाकारण वारंवार होत असेल, तर ब्लड शुगरची तपासणी आवर्जुन करून घ्या.