विश्वसंचार

दोन महिलांचा मैत्रिणीसाठी वाघाशी पंगा!

Arun Patil

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चंपावरत जिल्ह्यामध्ये दोन महिलांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोर वाघाशी दोन हात करत त्यांच्या मैत्रिणीचा जीव वाचवला. 26 डिसेंबर रोजी ही घटना बून वनक्षेत्रामध्ये घडल्याची माहिती वनविभागाने दिली. त्यावेळी गीता, जानकी आणि पार्वती नावाच्या तीन महिला गुरांना चारण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी वाटेत सुगावाही लागणार नाही अशा पद्धतीने दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

गीतावर वाघ धावून गेला आणि त्याने तिला जंगलाच्या दिशेने फरफटत नेण्यास सुरुवात केली. गीताची वाघाशी झुंज सुरू असल्याचे पाहून तिच्या दोन्ही मैत्रिणींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी मोठ्या धाडसाने आजुबाजूला असणारे दगड उचलून ते वाघाच्या दिशेने ताकदीने भिरकावले, हातातल्या काठ्यांनी त्याच्यावर आघात केले. या दोघींच्या प्रतिहल्ल्याने वाघ नमला आणि एका क्षणात त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. अतिशय गंभीर अशा हल्ल्यामध्ये गीताला जबर दुखापत झाली.

बेशुद्ध अवस्थेतच तिला टनकपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तातडीने तिच्यावरील उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वाघाच्या हल्ल्यामुळे गीताच्या जखमेवर 24 टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरीही आता ती धोक्यात नाही. दरम्यान, सध्या परिस्थितीचे गांभीर्य पाहता बून वनक्षेत्राच्या आजुबाजूला राहणार्‍या नागरिकांना प्रशासनाने सतर्क केले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना तूर्तास कोणत्याही कारणाने जंगलात न जाण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT