Rats Fighting | लंडन मेट्रो स्टेशनवर दोन उंदरांची तुफान हाणामारी! 
विश्वसंचार

Rats Fighting | लंडन मेट्रो स्टेशनवर दोन उंदरांची तुफान हाणामारी!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल, याचा नेम नाही. कधी माणसांच्या रस्त्यावरील भांडणांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी प्राण्यांच्या; पण यावेळी इंटरनेटवर असा एक व्हिडीओ ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. हे प्रकरण लंडनच्या एका गजबजलेल्या मेट्रो स्टेशनवरील आहे, जिथे दोन उंदीर एकमेकांवर लाथा-बुक्क्या चालवताना दिसले!

अनेकदा आपण उंदरांना चीज किंवा अन्नाच्या तुकड्यामागे धावताना पाहिले असेल. परंतु, लंडनच्या ऑक्सफर्ड सर्कस स्टेशनवर काहीतरी वेगळेच पाहायला मिळाले. येथे दोन उंदरांनी अन्नावरून झालेल्या वादाचे थेट बॉक्सिंग रिंगमध्ये रूपांतर केले. प्लॅटफॉर्मवर मेट्रोची वाट पाहत असलेले प्रवासी त्यावेळेस अवाक्‌ झाले, जेव्हा दोन छोटे उंदीर माणसांसारखे दोन पायांवर उभे राहून एकमेकांवर ठोसे मारू लागले. हे संपूर्ण दृश्य लंडनच्या प्रसिद्ध सोहो परिसरातील ‘ऑक्सफर्ड सर्कस लंडन अंडरग्राऊंड स्टेशन’ येथील आहे.

२९ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओबाबत असे मानले जात आहे की, ही घटना आदल्या रात्रीची आहे. ट्रेनच्या रुळांजवळ प्लॅटफॉर्मवर पडलेला अन्नाचा एक छोटासा तुकडा या संपूर्ण भांडणाचे कारण बनला. दोघांपैकी कोणीही तो तुकडा सोडायला तयार नव्हते. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या महिलेने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लंडन अंडरग्राऊंडमध्ये फाईट फाईट फाईट, पण हे किती क्यूट आहेत!’

हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत १ लाख २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. लोकांना या दोन उंदरांची फाईट स्टाईल इतकी आवडली की, सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ‘माईस टायसन’ आणि ‘मिकी माऊस वॉर्ड’ अशी नावे दिली आहेत. या जबरदस्त हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असला, तरी या फाईटचा खरा विजेता कोण ठरला हे अद्याप सस्पेन्सच आहे. दोन्ही उंदीर एकमेकांना चितपट करण्यात व्यस्त होते आणि ट्रेन येण्यापूर्वी प्रवाशांसाठी हे एक उत्तम मनोरंजन ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT