नवी दिल्ली : 1947 ची भारत-पाकिस्तान फाळणी ही केवळ जमिनीची फाळणी नव्हती, तर ती लाखो लोकांची घरे आणि जीवाभावाचे नातेवाईक-मित्र हिरावून घेणारी एक शोकांतिका होती. या ऐतिहासिक फाळणीत बिछडलेले दोन मित्र तब्बल 78 वर्षांनंतर पुन्हा एकमेकांसमोर आले, तेव्हा काळाचे चक्र जणू तिथेच थांबले. या दोन वृद्ध मित्रांच्या भावनिक भेटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकर्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
इन्स्टाग्रामवर 9213 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘78 वर्षांनंतर भेटले दोन मित्र.’ व्हिडीओमध्ये दिसते की, दोन अत्यंत वृद्ध मित्र एकमेकांसमोर उभे आहेत. सुरुवातीला काही सेकंद त्यांच्यात पूर्ण शांतता पसरते, जणू ते आपल्या स्मृतींच्या पानातून जुन्या मित्राचा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ओळख पटताच त्यांच्यातील 78 वर्षांचे अंतर क्षणात मिटते. दोन्ही मित्र एकमेकांच्या जवळ येतात आणि घट्ट मिठी मारतात.
व्हिडीओच्या शेवटी दोन्ही मित्र बराच वेळ एकमेकांना मिठी मारून रडताना दिसतात. हा आनंद केवळ दोन व्यक्तींच्या भेटीचा नसून, फाळणीचा दशकांचा वेदनादायक प्रवास संपल्याचा होता. या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांना भावूक केले आहे. एका युझरने लिहिले, ‘अशी मैत्री काळाच्याही पलीकडची असते.’ तर दुसर्या एकाने लिहिले, ‘जर नात्यात खरेपण असेल, तर कितीही वर्षांचे अंतर ते संपवू शकत नाही.’ फाळणीच्या त्या भीषण काळात अनेकांना आपले घर आणि जवळची माणसे सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. अनेक कहाण्या अधुर्या राहिल्या, पण या दोन मित्रांच्या भेटीने दाखवून दिले की, खरी नाती कधीच संपत नाहीत, ती फक्त काळाच्या एखाद्या कोपर्यात आपली वाट पाहत असतात.