वॉशिंग्टन : अमेरिकेतील ‘केप कॉड’ हा परिसर तेथील झिंगे आणि ग्रेट व्हाईट शार्कच्या वाढत्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे; परंतु आता या पर्यटन स्थळाच्या नावे आणखी एका विलक्षण प्राण्याची नोंद झाली आहे. येथे दोन डोके असलेले दुर्मीळ ‘डायमंडबॅक टेरापिन कासवाचे पिल्लू आढळले असून, सर्व आव्हानांवर मात करत ते जिवंत आहे.
‘केप वाईल्डलाईफ सेंटर’ने दिलेल्या माहितीनुसार, अवघे ५.२ ग्रॅम (०.१८ औंस) वजन असलेले हे कासवाचे लहान पिल्लू १७ सप्टेंबर रोजी बार्नस्टेबल, मॅसेच्युसेट्स येथील वन्यजीव केंद्रात आणण्यात आले. ‘मास ऑडुबॉन वेलफ्रीट बे वाईल्डलाईफ सँक्च्युअरी’च्या प्रतिनिधींना वेलफ्रीट शहरातील एका सुरक्षित घरट्याच्या ठिकाणी हे पिल्लू सापडले होते. कासवाच्या या अवस्थेला ‘बायसेफॅली’ (Bicephaly) असे म्हणतात. हा एक अतिशय दुर्मीळ विकासदोष (Developmental Disorder) आहे. सामान्यतः एकच भ्रूण जुळ्या मुलांमध्ये विभक्त होताना पूर्णपणे वेगळा न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. यामुळे एकच धड असलेल्या; पण पूर्ण विकसित दोन स्वतंत्र डोके असलेल्या जुळ्या प्राण्यांचा जन्म होतो.
‘न्यू इंग्लंड वाईल्डलाईफ सेंटर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झॅक मर्त्झ यांनी सांगितले की, कासवांमध्ये बायसेफॅलीची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. जनुकशास्त्र आणि एपिजनेटिक्स (जनुके व पर्यावरणाचा परस्परांशी होणारा अभ्यास) हे दोन्ही घटक अशा प्रकारच्या शारीरिक दोषास कारणीभूत ठरतात असे मानले जाते. मर्त्झ यांनी सांगितले, “उपलब्ध संशोधनावर आधारित आमच्या अभ्यासानुसार, बायसेफॅली ही स्थिती अनुवांशिक आणि पर्यावरणविषयक घटकांच्या एकत्रित परिणामांमुळे निर्माण होते. याचा संबंध कासवांचे तुलनेने दीर्घ आयुष्य, अंडी घालण्यासाठी एकाच ठिकाणी वारंवार परत येण्याची त्यांची सवय आणि त्यांच्या संवर्धन स्थितीमुळे मर्यादित झालेला जनुक संच या घटकांशी असू शकतो.
तसेच, अंडी उबवण्याच्या काळातील तापमान, आर्द्रता, घरट्यांच्या ठिकाणांची भौतिक वैशिष्ट्ये किंवा त्यांच्या पालकांचा पर्यावरणातील ज्या घटकांशी संपर्क येतो, अशा पर्यावरणीय घटकांचाही यावर प्रभाव पडू शकतो. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत या भागात आढळलेले हे तिसरे बायसेफॅलिक (दोन डोके असलेले) टेरापिन कासव आहे. यामुळे या प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. अलीकडच्या वर्षांत इतरही वन्य प्राण्यांमध्ये बायसेफॅली आढळली आहे, ज्यामध्ये नेदरलँड्सच्या किनारपट्टीवर सापडलेली दोन डोके असलेली पॉरपॉईज (Porpoise - देवमाशासारखा जलचर) आणि तुर्कीच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली दोन डोके असलेली डॉल्फिन समाविष्ट आहे.