विश्वसंचार

ब्राँझ युगातील दोन कलाकृती उल्केतील लोखंडाच्या!

Arun Patil

माद्रिद : स्पेनमध्ये 60 वर्षांपूर्वी ब्राँझ म्हणजेच कांस्य युगातील काही कलाकृतींचा खजिनाच सापडला होता. सोबतच्या छायाचित्रात त्यामधील काही कलाकृती, वस्तूंच्या प्रतिकृती दिसत आहेत. स्पेनमधील या प्राचीन कलाकृतींपैकी काही चक्क बाह्य जगतातील वस्तूपासून बनलेल्या असल्याचे आता दिसून आले आहे. या कलाकृती उल्केतील लोखंडापासून बनलेल्या आहेत.

स्पेनमधील या खजिन्याला 'ट्रेजर ऑफ व्हिलेना' असे संबोधले जाते. सन 1963 मध्ये काही पुरातत्त्व संशोधकांनी त्यांचा शोध लावला होता. त्यामध्ये 59 बाटल्या, वाडगे आणि दागिन्यांच्या तुकड्यांचा समावेश होता. या वस्तूंची निर्मिती सोने, चांदी, अंबर आणि लोखंडापासून करण्यात आली होती. अलिकांटे प्रांतात एका थडग्याच्या खड्ड्यात या वस्तू सापडल्या. त्यामधील काही लोखंडी तुकडे पाहिल्यावर संशोधकांना त्यामध्ये वेगळेपण आढळले.

त्यामुळे या लोखंडी तुकड्यांचा अधिक बारकाईने अभ्यास करण्यात आला. हे तुकडे अधिक काळसर धातूचे होते जे काही ठिकाणी अतिशय चमकदार होते. त्यांच्यावर फेरससारख्या ऑक्साईडचा थर होता व तो अनेक ठिकाणी भंगलेलाही होता. या वस्तूंच्या नव्या अभ्यासात आढळले की यापैकी दोन कलाकृतींची निर्मिती सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या एका उल्केतील लोखंडापासून केली आहे. या वस्तूंमध्ये इंग्रजी 'सी' आकाराच्या एका ब्रेसलेटचा आणि सोन्याच्या शीटवरील एका पोकळ गोळ्याचा समावेश आहे. या दोन्ही वस्तूंची निर्मिती इसवी सन पूर्व 1400 ते 1200 या काळात करण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT