सिडनी : हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचण्यासाठी पॅसिफिक महासागरातील ‘टुवालू’ या बेटावरील 5,000 हून अधिक नागरिकांनी एका विशेष स्थलांतर व्हिसासाठी अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियाने देऊ केलेल्या या जगातल्या पहिल्याच प्रकारच्या व्हिसा योजनेमुळे, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या या देशातील नागरिकांना आशेचा किरण दिसला आहे; मात्र मर्यादित जागांसाठी आलेल्या अर्जांची प्रचंड संख्या या संकटाची तीव्रता दाखवून देत आहे.
टुवालूच्या नागरिकांसाठी या व्हिसाचे अर्ज 16 जून रोजी सुरू झाले आणि 18 जुलै रोजी बंद झाले. या योजनेअंतर्गत, लॉटरी पद्धतीने निवडलेल्या 280 टुवालू नागरिकांना 2025 पासून दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्याची संधी मिळेल. अर्ज सुरू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच देशाच्या 11,000 लोकसंख्येपैकी तब्बल 3,125 नागरिकांनी, म्हणजेच सुमारे एक तृतीयांश लोकांनी अर्ज दाखल केले होते.
11 जुलैपर्यंत हा आकडा 5,157 वर पोहोचला होता. ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्ये दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला टुवालू देश नऊ लहान प्रवाळ बेटांवर वसलेला आहे. या देशाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची भौगोलिक रचना. टुवालूमधील सर्वोच्च ठिकाण समुद्रसपाटीपासून फक्त 15 फूट (4.5 मीटर) उंच आहे, तर देशाची सरासरी उंची केवळ 6 फूट (2 मीटर) आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत असल्याने पूर आणि वादळांचा धोका प्रचंड वाढला आहे. एका अभ्यासानुसार, 2023 मध्ये टुवालूच्या आसपासची समुद्राची पातळी 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 6 इंच (15 सेंटीमीटर) जास्त होती. 2050 पर्यंत देशाचा बराचसा भूभाग आणि महत्त्वाची पायाभूत सुविधा भरतीच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.