ट्रम्प यांचे खासगी निवासस्थान तीन हजार कोटी रुपयांचे! Pudhari File Photo
विश्वसंचार

ट्रम्प यांचे खासगी निवासस्थान तीन हजार कोटी रुपयांचे!

या घरात 128 खोल्या, 58 बेडरुम आणि 33 बाथरूम आहेत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेऊन आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा दिमाखात व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करीत आहेत. एक शक्तीशाली पद म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे जगप्रसिध्द निवासस्थान आहे. मात्र, ट्रम्प यांचे खासगी निवासस्थानही तितकेच चर्चेत असते हे विशेष. काही लोक त्याला ‘विंटर व्हाईट हाऊस’ म्हणतात, तर कुणी त्याला आता ‘ब्रह्मांडाचे केंद्र’ही म्हणत आहेत. या आलिशान घराची किंमत तब्बल 3 हजार कोटी रुपये आहे.

जगभरात अनेक ठिकाणी उत्तुंग ‘ट्रम्प टॉवर’ उभे करणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वतःचे घर आलिशान असणे हे साहजिकच आहे. सोन्याच्या टेबल-खुर्चीपासून ते सोन्याने मढवलेल्या भिंतींपर्यंत, कोट्यवधी रुपयांच्या झुंबरांपासून ते घरात सजावटीसाठी ठेवलेल्या महागड्या वस्तूंपर्यंत इथे सर्व काही भव्य आहे. या घराची सुरक्षाव्यवस्थाही अर्थातच चोख आहे. ‘मार-ए-लागो’ असे या घराचे नाव. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यावेळेपासूनच ट्रम्प यांच्याबरोबरच हे निवासस्थानही जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले. फ्लोरिडाच्या पाम बीचवर हे ‘मार-ए-लागो’ आहे. खरे तर हे मूळचे एक रिसॉर्ट आहे, जे अनेक वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी खरेदी केले होते. सतरा एकर जागेत पसरलेल्या या रिसॉर्टला ट्रम्प यांनी 1985 मध्ये खरेदी केले होते. हा संपूर्ण परिसरच अतिशय ‘पॉश एरिया’ म्हणून ओळखला जातो. ट्रम्प यांच्या शेजारीच 50 पेक्षाही अधिक अब्जाधीश राहतात, त्यावरून या परिसराचे महत्त्व ओळखावे! ट्रम्प यांनी हे रिसॉर्ट 10 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. आता त्याची किंमत 342 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे तीन हजार कोटी रुपये आहे. या घरात 128 खोल्या, 58 बेडरुम आणि 33 बाथरूम आहेत. येथील बाथरूमही सोन्याने मढवलेली आहेत. इथे थिएटर, प्रायव्हेट क्लब आणि स्पासुध्दा आहे. सध्या हे ‘मार-ए-लागो’ जगातील एक शक्ती केंद्र म्हणून उदयास आले आहे. याचे कारण म्हणजे ते ट्रम्प यांचे निवासस्थान आहे. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यापासून या घरामध्ये अनेक मोेठे लोक येऊन गेले. यामध्ये टेस्लाचे मालक एलन मस्क, मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग अशा अनेक नामवंतांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT