वॉशिंग्टन : सध्या चार पायांचे व श्वानासारखे दिसणारे अनेक रोबो बनत आहेत. बोस्टन डायनॅमिक्सने बनवलेला ‘स्पॉट’ नावाचा रोबो कुत्रा हा अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लॅगो या रिसॉर्टची राखण करताना हा कुत्रा दिसतो.
या कुत्र्याकडे शस्त्र नसतात. लांबून त्याला नियंत्रित करता येतं. किंवा त्याने राखण करायचा आहे तो मार्ग त्यात प्रोग्राम करून ठेवला असेल, तर कुत्रा स्वयंचलित होतो. ‘स्पॉट’च्या प्रत्येक पायावर एक पाटी लिहिली आहे : ‘लाड करू नका.’ अर्थात कुत्रा दिसला की त्याला लाडाने गोंजारणारे अनेक असतात; पण या रोबो कुत्र्याबाबत कुणी लाडात येऊन असा प्रकार करू नये, असे आधीच सांगितले जाते! रिसॉर्टच्या परिसरात ऐटीत चालत असलेल्या ‘स्पॉट’चे व्हिडीओ अमेरिकेत टिकटॉकवर व्हायरल झालेत. काही जण त्याला ‘कूल’ आणि ‘गोंडस’ म्हणतात, तर काही त्याला क्रीपी म्हणजे दुसर्याला घाबरवून सोडणारा असंही म्हणतात. अमेरिकेतील टीव्ही शोमध्ये देखील या रोबोची म्हणजेच कुत्र्याची खिल्लीदेखील उडवली जात आहे. पण, ‘स्पॉट’ कडे जबाबदारीचे काम आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे रक्षण करणे, हे या रोबोचे प्रमुख काम आहे. पेन्सिल्वेनियामधल्या मॉन्टगोमेरी भागातल्या बॉम्ब पथकानेही ‘स्पॉट’ विकत घेतला आहे. स्फोट होऊ शकतो, अशा जागांची तपासणी करण्यासाठी या कुत्र्यांच्या वापर केला जातो. ‘स्पॉट’ फार चपळ आहे. तो भराभर पायर्या चढतो आणि उतरतो आणि लहान लहान जागांमध्येही पटकन घुसतो. त्याला दारही उघडता येतं. पण, येणार्या धोक्याची सूचना द्यायच्या त्याच्या क्षमतेचं सगळ्यांकडूनच कौतुक होत असतं. त्याच्या या गुणामुळेच अनेक संस्था या तंत्रज्ञानासाठी 75,000 डॉलर इतकी किंमत मोजायलाही तयार आहेत. हा रोबो राखण करू शकेल, असं तंत्रज्ञान यात विकसित करण्यात आलं आहे, त्या द़ृष्टीने त्यात सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे संरक्षण कामात त्याची खूप मदत होते. या रोबोमध्ये अनेक कॅमेरे बसवलेत. त्यामुळे परिसराचा एक थ—ीडी मॅपच मिळतो. पण, हा रोबो माणसाच्या सहकार्याशिवाय काही करू शकत नाही. रोबोवर नियंत्रण करण्यासाठी रिमोट वापरला जातो.