वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भरभरून कौतुक केले आहे. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरवरून झालेल्या संवादादरम्यान ट्रम्प यांनी या तिघांनाही ‘महान अमेरिकन, महान देशभक्त आणि शूर लोक’ असे संबोधले. तसेच, हे मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमधील ‘ओव्हल ऑफिस’ला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.
ट्रम्प यांनी अंतराळात असलेल्या जेसिका मीर, अनिल मेनन आणि जॅक हॅथवे यांची प्रशंसा करताना सांगितले, ‘‘तुमच्याशी संवाद साधणे हा एक मोठा सन्मान आहे. मी जेसिका, अनिल आणि जॅक यांचे आभार मानू इच्छितो. हे महान अमेरिकन, अत्यंत शूर आणि सच्चे देशभक्त आहेत.’’ या मोहिमेसाठी त्यांची निवड होणे हीच एक मोठी उपलब्धी असल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकन स्पेस फोर्समध्ये कर्नल असलेल्या अनिल मेनन यांनी अंतराळातून सेवा बजावताना अत्यंत अभिमान वाटत असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले. त्यांनी गेल्या आठवड्यात पार पडलेल्या ‘स्पेस वॉक’चा अनुभवही शेअर केला.
मेनन म्हणाले, ‘‘धन्यवाद, सर! स्पेस फोर्समध्ये कर्नल म्हणून काम करताना, कल्पनेपलीकडच्या या सर्वात मोठ्या क्षेत्रात सेवा बजावण्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. गेल्या आठवड्यात मला स्पेस वॉक करण्याचा मोठा सन्मान मिळाला. रोबोटिक आर्मवरून अंतराळ स्थानक पाहताना आपल्या अद्भुत क्षमतेची प्रचिती आली.’’ तसेच, अमेरिका आता पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे - चंद्र, चंद्रावरील बेस आणि मंगळ ग्रहाच्या मोहिमांची तयारी करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अनिल मेनन यांचा जन्म आणि पालनपोषण अमेरिकेतील मिनियापोलिस येथे झाले असून, त्यांचे आई-वडील भारत आणि युक्रेनमधून तेथे स्थायिक झाले होते. नासाने २०२१ मध्ये अंतराळवीर उमेदवारांच्या तुकडीत त्यांची निवड केली होती. यापूर्वी त्यांनी ‘स्पेसएक्स’चे पहिले फ्लाईट सर्जन आणि नासाच्या क्रू फ्लाईट सर्जन म्हणून काम पाहिले आहे.