Triple Drug Therapy Thyroid Cancer | स्वादुपिंडाच्या कर्करोगावर ‘ट्रिपल-ड्रग्ज थेरपी’ यशस्वी Mohammed Haneefa Nizamudeen
विश्वसंचार

Triple Drug Therapy Thyroid Cancer | स्वादुपिंडाच्या कर्करोगावर ‘ट्रिपल-ड्रग्ज थेरपी’ यशस्वी

प्राण्यांवरील चाचणीत सकारात्मक निकाल

पुढारी वृत्तसेवा

मॅड्रिड : अत्यंत घातक समजल्या जाणार्‍या स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या उपचारात आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. संशोधकांनी शोधलेली एक नवीन ‘ट्रिपल-ड्रग्ज थेरपी’ (तीन औषधांचे मिश्रण) सुरुवातीच्या प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली असून, यामुळे या आजाराच्या जगण्याच्या दरात मोठी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग हा जगातील सर्वात धोकादायक कर्करोगांपैकी एक मानला जातो. आकडेवारीनुसार : या आजाराचा पाच वर्षांचा सरासरी सर्व्हायव्हल रेट (जगण्याचा दर) केवळ 13% आहे. याचा अर्थ असा की, निदान झालेल्या 87 टक्के रुग्णांचा पाच वर्षांच्या आत मृत्यू होतो. जर या आजाराचे निदान शेवटच्या टप्प्यात झाले, तर हा जगण्याचा दर केवळ 1 टक्का इतका खाली येतो. ‘PNAS’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी अशा औषधांच्या मिश्रणाची चाचणी केली जी कर्करोग वाढवणार्‍या तीन मार्गांना एकाच वेळी रोखतात. उंदरांवर केलेल्या या प्रयोगात अत्यंत आशादायक निकाल पाहायला मिळाले.

या संशोधनाचे मुख्य पैलू असे :

प्रभावी उपचार : या थेरपीमुळे केवळ कर्करोगाची वाढच थांबली नाही, तर तो पुन्हा उद्भवण्यापासूनही रोखला गेला.

बिनविषारी : ही थेरपी उंदरांसाठी पूर्णपणे बिनविषारी ठरली असून, त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

STAT3 प्रथिनाचा शोध : संशोधनात असे आढळले की, जेव्हा कर्करोग वाढीचे इतर मार्ग रोखले जातात, तेव्हा ‘STAT3’ नावाचे प्रथिन सक्रिय होऊन कर्करोगाला जिवंत ठेवण्यास मदत करते. नवीन उपचारात या ‘बॅकअप’ मार्गालाही रोखले जाते. सध्या उपलब्ध असलेली केमोथेरपी शरीरातील वेगाने विभाजित होणार्‍या सर्वच पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच, कर्करोगाच्या पेशी अनेकदा या उपचारांना दाद न देता वाढण्याचे नवीन मार्ग शोधतात. नवीन ‘ट्रिपल थेरपी’ या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करते. ‘हे निकाल स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी नवीन क्लिनिकल ट्रायल्स (मानवी चाचण्या) सुरू करण्याचा मार्ग मोकळा करत आहेत,’ असे स्पॅनिश नॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटरच्या वरिष्ठ लेखिका कारमेन गुएरा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT