कैरो : प्राचीन इजिप्शियन लोकांनी पिरॅमिड सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय केले होते. पण, त्यांनी कधी सापळे किंवा ‘बूबी ट्रॅप्स’ वापरले होते का? इजिप्तॉलॉजिस्ट (इजिप्तशास्त्राचे अभ्यासक) सांगतात की, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. इजिप्तॉलॉजिस्ट रेग क्लार्क म्हणाले, ‘नाही, त्यांनी पिरॅमिडमध्ये सापळे वापरले नाहीत; पण त्यांनी आत जाणे खूपच कठीण केले होते!’
प्राचीन इजिप्शियन थडग्यांच्या सुरक्षिततेवर विस्तृत लेखन करणार्या क्लार्क यांनी सांगितले की, पिरॅमिडमध्ये सापळ्यांची कल्पना कुठून आली, हे स्पष्ट नाही. ‘इंडियाना जोन्स’ आणि ‘टॉम्ब रायडर’ यांसारख्या चित्रपट आणि व्हिडीओ गेम्समध्ये असे सापळे दाखवले गेले आहेत. परंतु, प्राचीन इजिप्शियन लोकांनी खोट्या जमिनीखालील खिळ्यांचे खड्डे किंवा एखाद्याला उलटे लटकवणारे फासे असे सापळे वापरल्याचे दिसत नाही.
पिरॅमिडवर विस्तृत लेखन करणारे इजिप्तॉलॉजिस्ट रॉल्फ क्रॉस म्हणाले, सापळ्यांविषयी इजिप्तॉलॉजिस्टना माहिती नाही. क्रॉस म्हणाले की, पिरॅमिड लुटू इच्छिणार्या चोरांना थांबवण्यासाठी हे सापळे प्रभावी ठरले नसते. त्यांनी नमूद केले की, प्राचीन काळात थडगी लुटणारे चोर मोठ्या गटात काम करत असत आणि सापळा संपूर्ण गटाला अडवू शकला नसता. तुम्ही सापळ्यामध्ये एक किंवा दोन चोरांना पकडू शकता, असे क्रॉस म्हणाले; पण इतरांचे काय?
सापळा लपवण्यासाठी पुरेसा मोठा असलेला पिरॅमिड किंवा थडगं एका व्यक्तीला लुटता येत नाही; त्यासाठी एका गटाचीच गरज असते. त्यामुळे, पिरॅमिड बनवणार्यांनी लोकांना त्या वास्तूंना लुटण्यापासून रोखण्यासाठी विविध स्थापत्यशास्त्राच्या पद्धती वापरल्या. क्लार्क यांनी त्यांच्या ‘सिक्युअरिंग एटर्निटी : एन्शियंट इजिप्शियन टॉम्ब प्रोटेक्शन फ्रॉम प्रिहिस्टरी टू द पिरॅमिडस्’ या पुस्तकात लिहिले आहे की पिरॅमिड बांधण्याचे एक कारण राजाच्या अंतिम विश्रांतीच्या ठिकाणाचे संरक्षण करणे हे होते.
पिरॅमिड बांधण्यापूर्वी, राजांना लहान ‘मस्टाबा’ नावाच्या थडग्यांमध्ये पुरले जात असे. या थडग्यांमध्ये शिरणे सोपे होते. याउलट, पिरॅमिडच्या आत किंवा खाली असलेल्या राजाच्या दफन कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी चोरांना खूप खोलवर बोगदा खणावा लागत असे. ‘पिरॅमिडच्या संरचनेतील प्रचंड वस्तुमान आणि प्रतिरोधक साहित्यामुळे आतल्या किंवा खालील व्यवस्थेला उच्च दर्जाचे संरक्षण मिळाले,’ असे क्लार्क यांनी सांगितले.