वॉशिंग्टन ः अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनच्या तज्ज्ञांनी एका 58 वर्षांच्या रुग्णाच्या शरीरात जनुकीय सुधारणा केलेल्या डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले आहे. या शस्त्रक्रियेनंतर सध्या रुग्णाची स्थिती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. एखाद्या प्राण्याच्या हृदयाचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्याची ही जगातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 57 वर्षे वयाच्या एका रुग्णाच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या रुग्णाच्या शरीरात हे हृदय दोन महिने धडकत होते. दोन महिन्यांनंतर या रुग्णाचा मृत्यू झाला होता.
आता ज्या 58 वर्षीय रुग्णाच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले आहे त्याचे नाव लॉरेन्स फॉसेट असे आहे. त्याच्या या हृदय प्रत्यारोपणाच्या यशाबाबत डॉक्टरांची टीम आशावादी आहे. डुकराचे हे हृदय मानवामध्येही चांगल्याप्रकारे काम करू शकेल असे त्यांना वाटते. सध्या या रुग्णामध्ये कोणतीही गुंतागुंत दिसून येत नाही. त्यामुळे हे डुकराचे सुधारित हृदय मानवी शरीरालाही अनुकूल ठरेल असे म्हटले जात आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सर्जननी जनुकीयरीत्या सुधारित डुकराच्या हृदयाचे अशा व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण केले आहे ज्याच्यावर उपचारासाठीचा अन्य मार्ग शिल्लक नव्हता. यापूर्वी ज्या डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरात डुकराचे हृदय प्रत्यारोपित केले होते त्याच डॉक्टरांनी आता ही शस्त्रक्रिया केली आहे.
मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. बार्टली ग्रीफिथ असे त्यांचे नाव आहे. पहिल्या प्रकरणात प्रत्यारोपणानंतर रुग्णामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंत निर्माण झाल्या होत्या. तसेच डुकरांना संक्रमित करणार्या विषाणूच्या संक्रमणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, आता दुसर्या वेळेस अधिक सावधगिरी बाळगण्यात आल्याचे डॉ. बार्टली यांनी सांगितले. त्यामुळे यावेळी असे संक्रमण किंवा गुंतागुंत दिसून येणार नाही, अशी त्यांना आशा आहे. सर्जरीनंतर सध्या लॉरेन्स यांची प्रकृती बरीच चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉरेन्स हे असाध्य अशा हृदयरोगाने पीडित होते. याशिवाय त्यांच्यामध्ये अन्यही काही आरोग्याशी संबंधित समस्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण हाच मार्ग शिल्लक होता. सध्या झेनोट्रान्सप्लांटेशन विज्ञानाने जीन एडिटिंग आणि क्लोनिंग तंत्रासह मोठीच प्रगती केली आहे. त्या माध्यमातून प्राण्यांच्या अवयवांना असे मॉडिफाईड केले जात आहे जेणेकरून त्यांचा मानवी शरीर स्वीकार करील. अर्थात हे प्रयत्न सध्या प्राथमिक टप्प्यात आहेत.