नवी दिल्ली : तुम्ही सुद्धा वारंवार येणार्या विमा पॉलिसीच्या कॉल्समुळे किंवा अनोळखी फसव्या फोनमुळे त्रस्त आहात का? तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)) ने बनावट कॉल्स आणि फ्रॉड रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता सर्व विमा कंपन्यांना त्यांचे सर्व्हिस आणि ट्रांझॅक्शन कॉल्स करण्यासाठी ‘1600’ ने सुरू होणारी नंबर सीरिज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ट्रायच्या नवीन आदेशानुसार, IRDAI (भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण) अंतर्गत येणार्या सर्व विमा कंपन्यांना आता त्यांच्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी 10 अंकी मोबाईल नंबरऐवजी 1600 ने सुरू होणारी विशेष सीरिज वापरावी लागेल. या बदलासाठी कंपन्यांना 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यामुळे फोन उचलण्यापूर्वीच स्क्रीनवर 1600 ही सीरिज दिसेल, ज्यामुळे कॉल खरोखरच विमा कंपनीचा आहे की फेक, हे समजणे सोपे होईल. बहुतेक फ्रॉड प्रकरणांमध्ये भामटे 10 अंकी मोबाईल नंबरवरून फोन करून स्वतःला इन्शुरन्स एजंट भासवतात.
नवीन नियमानंतर अशा बनावट कॉल्सवर आळा बसेल. कोणत्याही थर्ड-पार्टी अॅपशिवाय (उदा. ट्रूकॉलर) सामान्य माणूस कॉलची ओळख पटवू शकेल. वैयक्तिक कॉल्स आणि बिझनेस कॉल्स यातील फरक स्पष्ट होईल, ज्यामुळे लोकांची दिशाभूल होणार नाही. TRAI ने केवळ विमा क्षेत्रासाठीच नाही, तर RBI (बँकिंग), SEBI (शेअर बाजार) आणि PFRDA शी संबंधित संस्थांसाठीही हा नियम आधीच अनिवार्य केला आहे.
दूरसंचार विभागाने (DoT) विशेषतः बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रासाठी 1600 सीरिज राखून ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 570 हून अधिक मोठ्या संस्थांनी ही नवीन सीरिज स्वीकारली असून, 3000 पेक्षा जास्त नंबर जारी करण्यात आले आहेत. यामुळे येणार्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.