हिरे हे जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंमध्ये गणले जातात. प्रत्येकालाच एक चकाकणारा, झळाळणारा हिरा हवा असतो; पण सामान्य माणसासाठी हा स्वप्नातलाच विषय ठरतो. कारण, त्याची जबरदस्त किंमत! ही किंमत इतकी जास्त का असते, यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. हे हिरे सहज तयार होत नाहीत. त्यांना अनेक अब्ज वर्षांचा कालावधी, प्रचंड उष्णता आणि दाब लागतो. अशा परिस्थितीत तयार झालेले हिरे ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ येतात आणि ‘किंबरलाईट’ किंवा ‘लॅम्प्रोईट’ नावाच्या खडकांमध्ये साठवले जातात. यानंतर होते खाणकाम, जे दोन प्रकारे होते : ओपन-पिट माईनिंग : जमिनीवरून जवळ असलेले हिरे काढले जातात. अंडरग्राऊंड माईनिंग : खोल जमिनीत जाऊन हिरे शोधले जातात. या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रचंड खर्च आवश्यक असतो. म्हणूनच हे स्पष्ट होते की, हिरे इतके महाग का असतात. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, रशिया हा जगातील सर्वात मोठा हिरे उत्पादक देश आहे. रशिया व अन्य हिरे उत्पादक देशांची ही माहिती...
रशिया : हा देश दरवर्षी 4 कोटी कॅरेटहून अधिक हिरे काढतो. रशिया जगातील सर्वात मोठा हिरे निर्यातदार आहे. ‘अलरोसा’ ही कंपनी एकटीच 95 टक्के हिरे उत्पादन करते. रशियात 12 खुल्या खाणींद्वारे मोठ्या प्रमाणावर हिरे मिळतात.
बोत्सवाना : अफ्रिकेतील हा देश दरवर्षी 2 कोटी कॅरेट हिरे मिळवतो. या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर हिर्यांवर अवलंबून आहे. अलीकडेच या देशात अतिशय मोठ्या आकाराचा हिरा सापडला होता.
काँगो : हा देश दरवर्षी 1.6 कोटी कॅरेट हिरे मिळवून 135 दशलक्ष डॉलर उत्पन्न मिळवतो. आफ्रिकेत दुसरा, तर जगात तिसर्या क्रमांकाचा उत्पादक.
ऑस्ट्रेलिया : हा देश 19 व्या शतकापासून खाणीतून हिरे काढत आहे. जरी साठे आता कमी झाले असले, तरी आजही 4 थ्या क्रमांकावर आहे.
कॅनडा : कॅनडाने 1990 च्या दशकात हिरे खाणकामास सुरुवात केली. एकाटी, डायविक अशा खाणींमुळे जगात पाचव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिका : 1875 मध्ये ‘युरेका डायमंड’ सापडल्याने देशाचे नशीब पालटले. दरवर्षी 70 लाख कॅरेट हिरे सापडतात.
अंगोला : 2023 मध्ये 98 लाख कॅरेट हिरे सापडले. देशाची अर्थव्यवस्था याच हिर्यांनी सावरणारी.
झिम्बाब्वे : ‘मारांगे डायमंड फील्डस्’ हे जगातील सर्वात मोठ्या हिरे साठ्यांपैकी एक. देश 8 व्या क्रमांकावर आहे.
नामीबिया : 1908 मध्ये इथे हिरे सापडले आणि देशाचे नशीब बदलले. सरकार आणि डी बीयर्स कंपनी मिळून खाणकाम करतात. देश 9 व्या क्रमांकावर आहे.