World's Tiny Frogs | स्वल्पविरामाएवढे पिल्लू अन् पेन्सिलच्या टोकाएवढा बेडूक 
विश्वसंचार

World's Tiny Frogs | स्वल्पविरामाएवढे पिल्लू अन् पेन्सिलच्या टोकाएवढा बेडूक

लुप्त होण्याच्या मार्गावरील दुर्मीळ प्रजातीला मिळाली संजीवनी!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : नवीन प्रजातींना सेलिब्रिटींची नावे देण्याची प्रथा असताना, घानाचे संवर्धन जीवशास्त्रज्ञ कालेब ओफोरी-बोटेंग यांनी जगातील सर्वात लहान आणि नामशेष होण्याच्या मार्गावरील एका बेडकाला आपल्या कष्टकरी आईचे नाव दिले आहे. 'अफिया बिरागो पडल फ्रॉग' असे या दुर्मीळ बेडकाचे नाव असून, त्याचे सूक्ष्म रूप आणि अस्तित्वाचा संघर्ष सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा तपकिरी रंगाचा बेडूक जगातील सर्वात सूक्ष्म उभयचर प्राण्यांपैकी एक आहे. पूर्ण वाढ झाल्यावर याची लांबी अवघी दोन सेंटीमीटर, तर वजन १.७५ ग्रॅमपेक्षाही कमी असते. जन्माला येणारे पिल्लू (टॅडपोल) एखाद्या स्वल्पविरामाएवढे लहान असते, तर लहान बेडकाचा आकार पेन्सिलच्या टोकापेक्षाही लहान म्हणजेच फक्त ५ मिलिमीटर इतका असतो. हा बेडूक 'स्प्रिंगटेल्स' नावाचे अत्यंत सूक्ष्म सहा पायांचे कीटक खाऊन जगतो.

लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर

संपूर्ण पृथ्वीवर हा बेडूक केवळ दक्षिण-पूर्व घानातील 'अटेवा रेंज फॉरेस्ट रिझर्व्ह'मधील दोनच बारमाही डबक्यांमध्ये शिल्लक राहिला आहे. यापूर्वी काकुम नॅशनल पार्कजवळ तो आढळला होता; मात्र तिथे कोकोची शेती झाल्याने त्याचा अधिवास पूर्णपणे नष्ट झाला. अटेवा जंगलातही 'गॅलम्सी' म्हणजेच बेकायदेशीर सोने उत्खननामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊन हा बेडूक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.

कृत्रिम पावसातून प्रजनन आणि आईची प्रेरणा

प्रजाती वाचवण्यासाठी २० बेडूक 'लंडन झू'मध्ये नेण्यात आले. तिथे क्युरेटर बेन टॅपले यांनी आर्द्रता वाढवून कृत्रिम पावसाचे वातावरण तयार केले आणि १५ पिल्लांना जन्म देण्याचा विक्रम केला. वडिलांच्या निधनानंतर डोक्यावर जुन्या कपड्यांचे ओझे वाहून आठ मुलांना शिकवणाऱ्या आपल्या आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत ओफोरी-बोटेंग यांनी या सूक्ष्म जीवाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT