लंडन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील प्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मधील ६० वर्षे जुन्या एका फोटोनं इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोत दिसणारी एक व्यक्ती आधुनिक काळातील कपडे आणि हेअरकटमध्ये दिसत असल्यामुळे, ही व्यक्ती भविष्यातून म्हणजेच 'टाईम ट्रॅव्हल' करून भूतकाळात आली असावी, असा दावा अनेकांनी केला आहे.
जोसी विव्हर नावाच्या ३० वर्षीय तरुणीला तिच्या आजोबांच्या १९६८ मधील डिस्नेलँडच्या जुन्या सुट्टीच्या फोटोंमध्ये ही अनोखी बाब निदर्शनास आली. या फोटोत न्यू ऑर्लिन्स स्क्वेअरमध्ये उभे असलेल्या इतर पर्यटकांनी औपचारिक आणि कॉलरचे शर्ट परिधान केलेले दिसत आहेत. मात्र, त्यांच्याच मध्यभागी उभी असलेली एक व्यक्ती नेव्ही ब्लू रंगाचा साधा टी-शर्ट, आधुनिक बाजूचे फेड केलेले केस, सनग्लासेस आणि खांद्याला अडकवलेली आधुनिक चौरस बॅग घेऊन उभी आहे. १९६० च्या दशकाच्या तुलनेत या व्यक्तीचा पेहराव पूर्णपणे वेगळा आणि आधुनिक युगातील वाटत असल्याने हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. टिकटाॅकवर या व्हिडीओला २७ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
युजर्सच्या विविध प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सचा असा विश्वास आहे की, ही व्यक्ती खरोखरच भविष्यातून आलेला टाईम ट्रॅव्हलर असावी, कारण त्या व्यक्तीचे कपडे आणि फॅशन त्या काळाशी अजिबात जुळत नाही. दुसरीकडे, अनेक तर्कवादी लोकांनी या दाव्याचे खंडन केले आहे. १९६० च्या दशकातही टी-शर्ट, कॅमेरा बॅग आणि रे-बॅन सारखे गॉगल अस्तित्वात होते, त्यामुळे हा केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीही १९७७ च्या एल्विझ प्रिसले यांच्या मैफिलीत स्मार्टमफोनसारखे उपकरण वापरणारी महिला आणि प्राचीन ग्रीक शिल्पात लॅपटॉपसारखी वस्तू दिसल्याचे दावे समोर आले आहेत. दरम्यान, या फोटोंमध्ये कोणतेही सत्य नसून केवळ जुन्या फोटोंमधील हे एक कुतूहल असल्याचे मानले जात आहे.