वॉशिंग्टन : ‘स्पेसएक्स’चे सर्वेसर्वा तसेच अमेरिकन सरकारचे एक महत्त्वाचे सल्लागार एलन मस्क यांनी आता पुन्हा एकदा मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. तत्पूर्वी पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला हटवण्याची गरजही त्यांनी स्पष्ट केली आहे. ‘आयएसएस’ची मुदत आता संपली असून, ते आता पृथ्वीच्या कक्षेतून हटवण्याची वेळ आली आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे.
एलन मस्क यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे की, ‘आयएसएस’ने आपले उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे. आता त्याची अतिशय कमी उपयुक्तता शिल्लक राहिली आहे. मस्क यांनी पुढे लिहिले आहे की चला, मंगळावर जाऊया! एक्सच्या एका यूजरच्या पोस्टवर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कधी हटवायचे याबाबतचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेतील. मात्र, ते दोन वर्षांमध्ये हटवले जावे अशीच माझी शिफारस आहे. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘आयएसएस’ला ‘डिऑर्बिट’ करण्याचा मुद्दा आणला आहे. याचा अर्थ या स्थानकाला पृथ्वीच्या कक्षेतून हटवणे.
अर्थात, ‘आयएसएस’ला 2030 मध्ये हटवण्याची योजना आधीच बनलेली आहे. गेल्या वर्षी मस्क यांच्याच ‘स्पेसएक्स’ कंपनीला ‘आयएसएस’ला हटवण्यासाठी 843 दशलक्ष डॉलर्सचे काँट्रॅक्ट देण्यात आले होते. त्याला हटवण्यासाठी स्पेसएक्स एका शक्तिशाली कॅप्सूलचा वापर करील. या योजनेनुसार ते पृथ्वीच्या वातावरणात आणून पूर्णपणे जाळले जाईल व त्याचे अवशेष महासागरात पाडले जातील. अमेरिका आणि रशियाने 1998 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवण्यासाठी एक-एक हिस्सा कक्षेत पाठवला होता. त्यानंतर दोन वर्षांनी अंतराळवीर तिथे गेले होते. अन्यही अनेक देशांनी या स्थानकासाठी आपले योगदान दिले. त्याचे रोबोटिक आर्म्स कॅनडाने दिले होते. तसेच अनेक भाग युरोप व जपानकडून आले होते. हे स्थानक आता हटवल्यानंतर कक्षेत खासगी स्पेस स्टेशन्सना जागा मिळू शकते, असे मस्क यांना वाटते.