बीजिंग : एका अनपेक्षित घटनेमुळे, तीन चिनी अंतराळवीर, ज्यांना टायकोनॉटस् म्हणतात, अंतराळात तात्पुरते अडकले आहेत. पृथ्वीवर परतण्याच्या काही तास आधी, त्यांच्या रिटर्न कॅप्सूलला ‘अंतराळ कचर्याच्या’ एका तुकड्याचा धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे. नेमके काय घडले, याचा अधिकारी तपास करत आहेत. मात्र, या यानाला किती नुकसान झाले आहे किंवा अंतराळवीर कधी पृथ्वीवर परततील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
वांग जी, चेन झोंग रुई आणि चेन डोंग या तीन टायकोनॉटस्चा शेंझोऊ-20 चमू 24 एप्रिलपासून चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर वास्तव्यास आहे. 31 ऑक्टोबरला स्पेस स्टेशनवर आलेल्या शेंझोऊ-21 चमू सोबत हस्तांतरण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, हा चमू बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर परतणार होता. मात्र, बुधवारी सकाळी 10.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार), चायना मॅन्ड स्पेस एजन्सीच्या प्रतिनिधींनी चिनी सोशल मीडिया साईट वेइबोवर एका निवेदनाद्वारे अंतराळवीरांचा परतीचा प्रवास स्थगित केल्याची घोषणा केली.
विलंब होण्याचे कारण देताना प्रतिनिधींनी सांगितले की, ‘क्रूच्या रिटर्न कॅप्सूलवर अंतराळ ढिगार्यातील लहान वस्तूचा आघात झाल्याचा संशय आहे.’ सध्या अंतराळ स्थानकावर असलेल्या सहाही टायकोनॉटस्चे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आघात विश्लेषण आणि धोका मूल्यांकन सुरू आहे, असे एजन्सीने स्पष्ट केले आहे. या घटनेबद्दल इतर कोणतेही तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. संभावित नुकसान झालेले हे अंतराळयान अजूनही तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनला जोडलेले असण्याची शक्यता आहे. हे यान तीन वेगळ्या भागांचे बनलेले आहे: पॉवर आणि प्रॉपल्शन मॉड्यूल, क्रू राहण्याची जागा आणि पॅराशूट-सहाय्यित रिटर्न मॉड्यूल.
जर या यानाचा कोणताही भाग असुरक्षित आढळला, तर अंतराळवीरांशिवाय ते यान पृथ्वीवर परतण्यासाठी अंतराळ स्थानकावरून बाहेर काढले जाईल. अशा परिस्थितीत, CMSA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शेंझोऊ-20 चमू शेंझोऊ-21 च्या रिटर्न मॉड्यूलने पृथ्वीवर परत येईल. त्यानंतर, शेंझोऊ-21 च्या कॅप्सूलच्या जागी CMSA ने राखीव ठेवलेले दुसरे अंतराळयान तैनात केले जाईल. या मोहिमेदरम्यान, शेंझोऊ-20 चे कमांडर चेन डोंग यांनी एका चिनी अंतराळवीराद्वारे अंतराळात सर्वात जास्त दिवस राहण्याचा (एकूण दिवस) विक्रम मोडला आहे. ते आतापर्यंत 400 दिवसांहून अधिक काळ पृथ्वीभोवती फिरत आहेत.
या विलंबामुळे त्यांच्या विक्रमात आणखी वाढ होणार आहे. (सर्वात जास्त सलग नसलेले दिवस अंतराळात राहण्याचा सध्याचा जागतिक विक्रम रशियन कॉस्मोनॉट ओलेग कोनोन्को यांच्या नावावर आहे, जे 1,111 दिवस अंतराळात राहिले आहेत.) चेन डोंग यांची ही परिस्थिती ‘नासा’चे अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांच्यासारखीच आहे. रुबिओ यांच्या रिटर्न मॉड्यूलला मेटिऑरॉईडच्या धडकेने नुकसान झाले होते, त्यामुळे त्यांना अमेरिकेसाठी सर्वात जास्त दिवस (371 दिवस) अंतराळात राहण्याचा विक्रम अनपेक्षितपणे करावा लागला होता.