लंडन : एका नवीन अभ्यासानुसार, हजारो वर्षांपूर्वी निएंडरथल मानवाने लाल आणि पिवळ्या रंगाचे ‘क्रेयॉन’ तयार केले होते. या साधनांची टोके परिपूर्ण धारदार करण्यासाठी त्यांनी विविध तंत्रांचा वापर केला होता. आता ‘क्राइमिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणी राहणार्या या निएंडरथल लोकांनी त्यांचे क्रेयॉन ओकर या लोह-युक्त खनिजापासून बनवले होते, ज्याचा उपयोग रंगद्रव्य म्हणून केला जातो.
नवीन अभ्यासात, संशोधकांनी सुमारे 1 लाख वर्षांपूर्वीचे तीन ओकर क्रेयॉन ओळखले, ज्यांचा ‘नियोजित वापर’ केल्याचे दिसून आले आहे, ज्यात एक धारदार टोक असलेला क्रेयॉनही आहे. हा शोध निएंडरथल मानवामध्ये प्रतीकात्मक कला निर्माण करण्याची क्षमता होती की नाही यावरील वादात आणखी पुरावा जोडतो. या प्रकरणात, जरी लेखकांना कोणतेही प्रत्यक्ष ‘चिन्ह’ सापडले नसले, तरी त्यांनी सुचवले आहे की जर निएंडरथल लोकांनी ओकरचा उपयोग कातडी कमावणे यांसारख्या इतर कामांसाठी केला असता, तर त्यांना अशा धारदार टोकाची गरज भासली नसती.
‘सायन्स अॅडव्हान्सेस’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, क्राइमियातील निएंडरथल काहीवेळा ओकरचा उपयोग शरीरावर चिन्हे रेखाटणे यांसारख्या सामाजिक आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या महत्त्वपूर्ण कामांसाठी करत होते, असे वारंवार धारदार केल्याच्या पुराव्यावरून दिसून येते. नॉर्वेतील बर्गन विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे पहिले लेखक फ्रांसेस्को डी’एरिको म्हणाले की, ‘जेथे टोक पुन्हा धारदार केल्याचा स्पष्ट पुरावा आहे. असा तुकडा शोधणे खरोखर रोमांचक आहे. कारण हे दर्शवते की, बारीक रेषा काढण्यासाठी या क्रेयॉनची निर्मिती आणि देखभाल केली गेली होती. ही खरोखर एक अतिशय खास गोष्ट आहे.’ तथापि, प्रत्येकजण संशोधकांच्या या निष्कर्षांशी सहमत नाही. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे ओकर क्रेयॉन सांस्कृतिक किंवा सामाजिक कलाकृती काढण्यासाठीच वापरले गेले याचा कोणताही थेट पुरावा नाही.
डी’एरिको यांच्या मते, या निष्कर्षांवरून असे सूचित होते की, निएंडरथल मानवामध्ये सामाजिक संकेतनिर्मिती करण्याची आणि आपल्या स्वतःच्या प्रजातीप्रमाणे (होमो सेपियन्स) त्यांचे शरीर सांस्कृतिक वस्तूंमध्ये रूपांतरित करण्याची मेंदूची क्षमता होती. प्रागैतिहासिक मानव आणि त्यांच्या नातेवाईकांनी लाखो वर्षांपासून रंगांच्या रंजकांचा (पिगमेंट) वापर केला आहे. आतापर्यंत, युरोपमधील जवळजवळ 40 ठिकाणी निएंडरथल लोकांनी काळा, लाल, पिवळा किंवा पांढरा रंग वापरल्याचे पुरावे सापडले आहेत; परंतु त्यांचा प्रत्येक वापर सामाजिक किंवा सांस्कृतिक हेतूसाठी नव्हता.