Fish Rain | विमानाने आकाशातून थेट तलावांमध्ये हजारो माशांचा पाऊस!  
विश्वसंचार

Fish Rain | विमानाने आकाशातून थेट तलावांमध्ये हजारो माशांचा पाऊस!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील युटा (Utah) राज्यात दरवर्षी एक अत्यंत अनोखा आणि आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळतो. येथे वैज्ञानिक आणि वन्य जीव विभाग थेट आकाशातून विमानाद्वारे पर्वतीय तलावांमध्ये हजारो मासे सोडतात. आकाशातून पडणारे हे मासे पाहताना रंगीबेरंगी कागदांचा पाऊस पडल्याचा भास होतो. मात्र, ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून ‘पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन’ वाढवण्यासाठी आखलेली एक विशेष मोहीम आहे. या अनोख्या उपक्रमामुळे युटा येथील अत्यंत दुर्गम भागात असलेल्या तलावांमध्येही मासेमारीचा आनंद घेणे पर्यटकांना शक्य झाले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात युटाचा ‘डिव्हिजन ऑफ वाईल्डलाईफ रिसोर्सेस’ (DWR) हा विभाग हा उपक्रम राबवतो. युटा येथील पर्वतांवर वसलेले तलाव हे पर्यटकांसाठी आणि मासेमारी शौकिनांसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र, हे तलाव उंच पर्वतांवर, अत्यंत दुर्गम घाट्यांमध्ये असल्यामुळे तेथे रस्ते नाहीत. तेथे ट्रक किंवा बोटीने पोहोचणे पूर्णपणे अशक्य आहे. यातील अनेक तलावांमध्ये नैसर्गिकरीत्या माशांची उत्पत्ती होत नाही किंवा त्यांचे प्रजनन खूप मर्यादित असते. त्यामुळे या तलावांमध्ये माशांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी विमानाद्वारे मासे आकाशातून थेट पाण्यात सोडणे हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे. विमानाने सोडले जाणारे मासे आकाराने खूप लहान म्हणजे साधारण १ ते ३ इंच लांबीचे असतात.

हलक्या विमानांमध्ये खास तयार केलेल्या टँकमध्ये शेकडो पाऊंड पाण्यासोबत हे मासे ठेवले जातात. वैमानिक झाडांच्या उंचीपेक्षा थोडे वरून अत्यंत कमी उंचीवर विमान उडवतात आणि तलावाच्या वर आल्यावर पाण्यासह मासे हवेत सोडून देतात. DWR ने केलेल्या पाहणीनुसार आणि सर्व्हेनुसार, मासे आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्यामुळे हवेतून पाण्यात पडल्यानंतरही जवळपास सर्वच मासे जिवंत राहतात आणि नवीन तलावात सहज जुळवून घेतात.

तलावांमध्ये सोडण्यासाठी माशांच्या प्रजातींची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जाते. यामध्ये रेनबो ट्राऊट, कटथ्रोट ट्राऊट, ब्रूक ट्राऊट, टायगर ट्राऊट, स्प्लेक आणि आर्क्टिक ग्रेइलिंग यांसारख्या मासेमारी शौकिनांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रजातींचा समावेश असतो. ज्या तलावांमध्ये आधीपासून स्थानिक ‘कटथ्रोट ट्राऊट’ आढळतात, तेथे त्याच प्रजातीचे मासे जास्त प्रमाणात सोडले जातात. तलावातील मासेमारीचे प्रमाण, तेथील पाण्याचे तापमान आणि माशांची वाढ होण्याच्या क्षमतेनुसार काही तलावांमध्ये दरवर्षी, तर काही तलावांमध्ये ३ ते ५ वर्षांच्या अंतराने हे मासे आकाशातून सोडले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT