Bhadrakali Mandir | ‘या’ मंदिरात आहे देवीची तब्बल ८ फूट उंच मूर्ती 
विश्वसंचार

Bhadrakali Mandir | ‘या’ मंदिरात आहे देवीची तब्बल ८ फूट उंच मूर्ती

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : तेलंगणातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या वारंगल (ओरंगुलू) येथील भद्रकाली मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे, तर प्राचीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. काकतीय राजवंशाच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारे हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध काली मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भद्रकाली देवीची तब्बल आठ फूट उंचीची मूर्ती आहे. महाराष्ट्रातील वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्तीही अतिशय भव्य आहे.

इतिहासानुसार, या मंदिराची स्थापना इसवी सन ६२५ मध्ये काकतीय राजा पुलकेशी द्वितीय यांनी केली होती. काकतीय राजांनी युद्धावर जाण्यापूर्वी किंवा कोणत्याही मोठ्या मोहिमेला निघण्यापूर्वी विजयासाठी याच भद्रकाली देवीचे आशीर्वाद घेतले होते. कालांतराने, दिल्ली सल्तनतच्या आक्रमणांमध्ये मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले होते; परंतु विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सुमार्ट १९५० च्या सुमारास) या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि ते पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर एका लहान टेकडीवरील नैसर्गिक खडकांवर अत्यंत सुंदररीत्या कोरलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवी भद्रकालीची सुमारे ८ फूट उंच भव्य आणि तेजस्वी मूर्ती पाषाणात कोरलेली आहे. देवीची ही मूर्ती आठ हात असणारी आहे. प्रत्येक हातात देवीने वेगवेगळी दैवी शस्त्रे धारण केलेली आहेत.

देवीचा चेहरा अत्यंत प्रभावी, तेजस्वी आणि उग्र असला तरी तिच्या डोळ्यांतून आणि मुखावरून भक्तांना प्रचंड वात्सल्य, आत्मीयता आणि संरक्षणाची अनुभूतीही मिळते. हे मंदिर भद्रकाली तलावाच्या काठावर वसलेले आहे. मंदिराच्या चारही बाजूला पसरलेले पाण्याचे विस्तीर्ण क्षेत्र आणि आजूबाजूची शांतता या ठिकाणाला एक वेगळेच आध्यात्मिक सौंदर्य मिळवून देते. सूर्यास्ताच्या वेळी तलावाच्या पाण्यात उमटणारे मंदिराचे प्रतिबिंब पाहण्यासाठी देश-विदेशांतून पर्यटक आणि छायाचित्रकार येथे येतात. येथे नवरात्रीचा सण अतिशय उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमधूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT