न्यूयॉर्क ः बर्म्युडा ट्रँगल आता कथा-कादंबर्यांचा, चित्रपटांचा आणि दंतकथांचा विषय बनलेला आहे. तेथील धोकादायक लाटा आणि जहाजे व विमानांचे रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे नेहमीच चर्चेत असते. यामागील कारणे शोधण्याचाही सातत्याने प्रयत्न केला जात असतो. आता संशोधकांनी त्याचे रहस्य उलगडले आहे.
उत्तर अटलांटिक महासागरात मियामी, बर्म्युडा आणि प्युर्तो रिकोच्या दरम्यान असलेल्या त्रिकोणीय सागरी भागाला 'बर्म्युडा ट्रँगल' असे म्हटले जाते. याठिकाणी अनेक जहाजे व विमानेही अचानक बेपत्ता झाली आहेत. तिथे अशी कोणती भौगोलिक कारणे आहेत ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात याबाबतचे संशोधन सुरू असते. अमेरिकेचा शोध लावणार्या ख्रिस्तोफर कोलंबसपासून आधुनिक वैज्ञानिकांपर्यंत अनेकांनी याबाबत लिहिले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की या परिसरातील समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणार्या वायूंमुळे तेथील पाण्याचे घनत्व कमी होते. त्यामुळे मोठी जहाजे बुडतात. तसेच या समुद्रात छोटी-मोठी बेटं आहेत. त्यांच्याशी टक्कर होऊनही जहाजे बुडतात. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोनार आणि रडारमुळे जहाजांना पाण्याखालील बेटांचा अंदाज येतो व त्यामुळे असे अपघात कमी होतात. तसेच या परिसरात वार्याचा वेग जास्त असतो. ढगांची दाटीही अधिक असते. त्यामुळे विमानेही भरकटतात. अशा वातावरणात त्यांचा अपघात होण्याची शक्यता असते. आता मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जहाजे आणि विमानांच्या अपघाताची शक्यता कमी झाली आहे.