लंडन : वनस्पतीजन्य आहाराला आपण ‘शाकाहारी’ म्हणतो, पण जर वनस्पतीच मांसाहारी असेल तर? जगाच्या पाठीवर अशा काही वनस्पती आहेत. घटपर्णीसारख्या अशा काही वनस्पती कीटकांची शिकार करून त्यांच्यामधील पोषक घटक शोषून घेतात. निसर्गाच्या गूढ विश्वात अशा अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत. यामध्ये वनस्पती विश्वाचा विचार केला, तर सर्वात विस्मयकारक आणि रहस्यमय वनस्पती म्हणून ‘व्हेनस फ्लायट्रॅप’ (Venus Flytrap) कडे पाहिले जाते. ही केवळ एक साधी वनस्पती नसून, एखाद्या शिकारी प्राण्याप्रमाणे कीटकांची कुशलतेने शिकार करणारी जगातील सर्वात प्रसिद्ध मांसाहारी वनस्पती आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, व्हेनस फ्लायट्रॅप ही वनस्पती प्रामुख्याने अशा जमिनीत वाढते, जिथे पोषक घटकांची (विशेषतः नायट्रोजनची) कमतरता असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी या वनस्पतीने एक अद्भुत मार्ग शोधून काढला आहे. जेव्हा एखादा कीटक (उदा. माशी, मुंगी किंवा कोळी) या वनस्पतीच्या पानांवर बसतो आणि पानांच्या आतील बाजूस असलेल्या छोट्या हेअर-लाईक ट्रिगर्सना (संवेदनशील केसांसारख्या भागांना) स्पर्श करतो, तेव्हा ही पाने विजेच्या वेगाने, अवघ्या काही मिलिसेकंदांत बंद होतात.
पाने बंद झाल्यानंतर ही वनस्पती पानांच्या आत पाचक स्राव (Digestive Juices) सोडून कीटकाचे विघटन करते आणि त्यातील आवश्यक पोषक तत्त्वेे शोषून घेते. काही दिवसांनंतर शिकार पचल्यावर पाने पुन्हा उघडतात आणि नवीन शिकारीची प्रतीक्षा करतात. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, या वनस्पतीकडे स्वतःचे असे मज्जासंस्था नसली, तरी स्पर्श मोजण्याची आणि गणिती अचूकता बाळगण्याची अद्भुत क्षमता असते. कीटकांच्या सततच्या धडपडीमुळे पानांवर होणाऱ्या दोन वेगवेगळ्या स्पर्शांनंतरच ही पाने पूर्णपणे बंद होतात. ज्यामुळे पानांची ऊर्जा वाया जात नाही. वनस्पती जगतातील हा एक अद्वितीय नमुना मानला जातो.