टोकियो : जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात. त्यापैकी एक असा पदार्थ जो फक्त निवडक लोकच शिजवू शकतात आणि तयार करू शकतात. जर ते नीट शिजवून खाल्ले नाही तर काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. हा पदार्थ म्हणजे जपानी डिश ‘फुगू’ आहे. ‘पफरफिश’ या माशाची ही डिश असते. हा मासा म्हणजे जगातील सर्वात विषारी अन्न मानले जाते. या माशामध्ये सायनाईडपेक्षा कितीतरी पट जास्त विष असतं, असं म्हटलं जातं. एका पफरफिशमध्ये इतके विष असते की ते 30 लोकांचा जीव घेऊ शकतो. कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सेफ्टीच्या अहवालानुसार, जपानमधील फुगू हे जगातील सर्वात विषारी अन्न आहे. या माशामध्ये टेट्रोडोटॉक्सिन आढळते. माशाच्या अंडाशय, आतडे आणि यकृतामध्ये जास्तीत जास्त टेट्रोडोटॉक्सिन असते.
हे एक न्यूरोटॉक्सिन आहे, जे सायनाईडपेक्षा 1200 पट जास्त घातक मानलं जातं. हे इतके विषारी असतं की, सुईच्या टोकाच्या आकाराप्रमाणेही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. एका फुगू माशामध्ये इतकं विष असतं की ते 30 लोकांचा जीव घेऊ शकते, असं म्हटलं जातं. जपानमधील अनेक रेस्टॉरंट्स फुगू डिश बनवतात आणि ही डिश केवळ खास प्रशिक्षित शेफद्वारे तयार केली जाते. प्रत्येकजण हा जपानी पदार्थ बनवू शकत नाही. ते करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि परवाना आवश्यक आहे. परवाना मिळवण्यासाठी शेफना अनेक वर्षांचं प्रशिक्षणही घ्यावं लागतं. विशेष म्हणजे फुगू डिश खूप महाग आहे साधारणपणे त्याची किंमत 3500 ते 20 हजार रुपयांपर्यंत असते. काही प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये, फुगू डिशची किंमत 35 हजार रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याची किंमत जास्त आहे कारण ती अनुभवी शेफने तयार केलेली असते. अत्यंत काळजीपूर्वक ही डिश बनवली जाते. या किमतीमध्ये साशिमी, सूप आणि ग्रील्ड फुगू सारख्या विविध फुगू पदार्थांचा समावेश आहे. फुगुची चव चांगली आहे, ज्यामुळे लोकांना ते खूप आवडतं आणि ही डिश तेवढी प्रसिद्ध व लोकप्रियही आहे.