कॅसोआ : पृथ्वी एका जागी स्थिर असत नाही. ती नेहमी फिरत असते, हे सर्वश्रुत आहे. पृथ्वीचे ब—ह्मांडातील स्थान नेमके कसे, किती आहे, यावर देखील आजवर बरेच संशोधन झाले आहे. मात्र, यानंतरही काही प्रश्नांचाही आपण विचार केलेला नसतो. असाच एक प्रश्न म्हणजे पृथ्वीचा मध्यबिंदू नेमका कुठे असेल? किंवा पृथ्वीच्या एकदम मधोमध असा कोणता देश येत असेल, जो जगाच्या नकाशाचा विचार करता मध्यवर्ती भागात असेल. एका संशोधनानुसार, हा केंद्रबिंदू आफ्रिका खंडातील घाना या देशाच्या सर्वात जवळ आहे. त्यामुळे घानाला पृथ्वीच्या भौगोलिक मध्यवर्ती देशांपैकी एक मानले जाते.
घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश आहे. तो अटलांटिक महासागराच्या किनार्यावर स्थित आहे आणि भौगोलिक द़ृष्ट्या पृथ्वीच्या मध्यवर्ती भागाच्या अगदी जवळ आहे. ग्रीनविच मेरिडियन आणि वृश्चिकवृत्त यांच्या जवळ हा देश असल्यामुळे याचे स्थान आणखी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माची ध्वजा रोवली आणि मठ स्थापन केला आहे. 15 व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. 1874 साली बि—टिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे याचे नाव ‘गोल्ड कोस्ट’ असे ठेवले. गोल्ड कोस्टला 1957 साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली, असा या देशाचा इतिहास आहे.