रोम : भव्य जहाज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर 'टायटॅनिक'च येते. मात्र, त्यानंतरच्या शंभर वर्षांच्या काळात अनेक भव्य जहाजं बनली गेली. अनेक भव्य क्रूझ शिप जगात प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळात तर मोटारी, जेट विमानांबरोबर अनेक धनकुबेर खासगी नौकाही घेऊ लागले. या यॉटस्मधील अनेक वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती यामुळे त्या चर्चेतही असतात. आता एक कंपनी अनोखी यॉट बनवत आहे. तिचा लूक शार्क माशासारखा असेल. तब्बल 9 हजार कोटी रुपये खर्च करून ही नौका बनवली जाणार आहे.
इटालियन डिझाईन स्टुडिओ 'लॅझ्झारिनी'ने या यॉटचे डिझाईन बनवले आहे. ही नौका प्रत्यक्षात बनवण्यासाठी हा प्रचंड मोठा खर्च येईल. मात्र, ही नौका अद्ययावत आणि आलिशानही असेल. ती 1056 फूट लांबीची असेल. तिचे नाव 'आऊटरेजियस' असे असेल. ती बनवण्यासाठी 860 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 9 हजार कोटी रुपये खर्च येईल. या नौकेत स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही असेल. नौकेत पाच हजार लोकांसाठी सोय असेल. ही यॉट एखाद्या क्रूझ शिपसारखीच असेल. नौकेवर प्रवाशांना फिरण्यासाठी गोल्फ कोर्सवर असतात तशा छोट्या गाडीचा वापर करावा लागेल. सध्या या नौकेचे केवळ डिझाईन बनले आहे. भविष्यात कुण्या धनकुबेराने ऑर्डर दिली तर ही नौका वास्तवातही तयार होईल.