लंडन ः जगात साप, विंचू, कोळी किंवा काही बेडकांसारखे विषारी प्राणी आहेत, हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, एक असा पक्षीही आहे, जो स्वतःच्या शरीरात घातक विष बाळगून उडतो? हा पक्षी म्हणजे ‘हुडेड पिटोहुई’ (Hooded Pitohui), जो जगातील सर्वात विषारी पक्षी म्हणून ओळखला जातो.
हा पक्षी प्रामुख्याने न्यू गिनीमध्ये आढळतो. दिसायला साधा असला, तरी त्याच्या शरीरात अत्यंत धोकादायक विष असतं. या पक्ष्याच्या त्वचेत, पिसांमध्ये आणि शरीरामध्ये Batrachotoxin नावाचं घातक न्यूरोटॉक्सिन आढळतं. हे इतकंं प्रभावी असतं की, ते माणसाच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं. यामुळे शरीर सुन्न होतं, पॅरालिसिस किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीत मृत्यूही होऊ शकतो. विशेष म्हणजे, या पक्ष्याच्या त्वचा आणि पिसांमध्ये हे विष सर्वाधिक प्रमाणात आढळतं.
हूडेड पिटोहुई स्वतः हे विष तयार करत नाही. तो आपल्या आहारातून हे विष जमा करतो. विशेषतः, काही विषारी कीटक खाल्ल्यामुळे त्याच्या शरीरात हे घातक द्रव्य साठतं. त्यामुळे हा पक्षी इतर प्राण्यांसाठी धोकादायक ठरतो. या पक्ष्याच्या चोचीचा अगदी छोटासा भागही माणसाला लागला की, तो माणसाला सुन्न करू शकतो. त्यामुळेच हा पक्षी नैसर्गिकरीत्या आपल्या शत्रूंपासून सुरक्षित राहतो. त्याच्या शरीरातील विषामुळे इतर प्राणी त्याच्यावर हल्ला करण्याचं टाळतात.