111 Year Old Woman | या आजीबाई १११ व्‍या वर्षीही एकदम फिट 
विश्वसंचार

111 Year Old Woman | या आजीबाई १११ व्‍या वर्षीही एकदम फिट

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : वयाच्या एका टप्प्यावर जिथे लोकांना चालणे-फिरणेही कठीण होते, तिथे १११ वर्षांच्या एका आजींची तंदुरुस्‍ती आणि उत्साह पाहून नेटिझन्स अवाक झाले आहेत. पूर्व चीनच्या जिआंगसू प्रांतातील रुगाओ शहरात राहणाऱ्या वांग गाइयिंग या कोणत्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर सहज चालतात. त्यांच्या या दीर्घायुष्याचे आणि तंदुरुस्तीचे रहस्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

घरची कामे हाच खरा व्यायाम

१११ वर्षांच्या वांग आजी कोणत्याही जिममध्ये जात नाहीत किंवा कोणतेही एनर्जी ड्रिंक घेत नाहीत. घरातील लहान-मोठी कामे करणे हाच त्या आपला खरा व्यायाम मानतात. झाडू मारणे, टेबल पुसणे आणि कपड्यांच्या घड्या घालणे यांसारखी कामे त्या स्वतः करतात. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला, तर काम केल्याने शरीरातील रक्तभिसरण चांगले राहते आणि हात-पाय सक्रिय राहतात, असे त्या सांगतात.

संतुलित आहार आणि मानसिक शांतता

वांग आजींना साधे जेवण आणि मासे (खायला आवडतात. त्या कधीही प्रमाणापेक्षा जास्त खात नाहीत. मानसिक शांतता हे त्यांच्या आरोग्याचे मुख्य सूत्र आहे. त्या रोज संध्याकाळी ७ वाजता झोपतात आणि सकाळी ७ वाजता उठतात. त्या म्हणतात की, चांगल्या झोपेमुळे निम्म्या समस्या आपोआप दूर होतात.

रुगाओ शहराचे भौगोलिक रहस्य

वैज्ञानिक संशोधनानुसार, रुगाओ प्रदेशातील मातीमध्ये विशिष्ट खनिजे आढळतात. त्यामुळे तेथील पिकांमध्ये पोषक घटक भरपूर असतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे या एकट्या परिसरात १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे तब्बल ६७२ लोक राहतात. वांग आजींची ही जीवनशैली सर्वांसाठीच आरोग्याचा एक नवा वस्तुपाठ ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT