Colorado River Water | तहानलेली झाडेच शोषताहेत ‘कोलोरॅडो’ नदीचे पाणी 
विश्वसंचार

Colorado River Water | तहानलेली झाडेच शोषताहेत ‘कोलोरॅडो’ नदीचे पाणी

पुढारी वृत्तसेवा

प्रिन्स्टन : वाढत्या तापमानामुळे कोलोरॅडो नदीच्या पाणी पातळीत होणार्‍या घटीमागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. एका नवीन अभ्यासानुसार, परिसरातील तहानलेली झाडे जमिनीतील अशा साठ्यातून पाणी शोषत आहेत, जे एरवी कोलोरॅडो नदीला जाऊन मिळायला हवे होते. या संशोधनामुळे अ‍ॅरिझोना आणि कॅलिफोर्नियासारख्या राज्यांच्या पाणी व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जगातील सुमारे 1.4 अब्ज लोक डोंगरांवरील बर्फ वितळून तयार होणार्‍या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एकट्या अमेरिकेत 10 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या केवळ कोलोरॅडो नदीच्या पाण्यावर आपली गरज भागवते. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे या नद्यांचा प्रवाह रोडावत चालला आहे. डोंगराळ भागातील पाणी प्रामुख्याने दोन मार्गांनी कमी होते. जमिनीतून होणारे बाष्पीभवन आणि वनस्पतींच्या पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन. या एकत्रित प्रक्रियेला ‘इव्हॅपो ट्रान्सपिरेशन’ म्हणतात. शास्त्रज्ञांना पूर्वी असे वाटायचे की, झाडे केवळ पावसाच्या किंवा बर्फाच्या वरवरच्या ओलाव्यावर अवलंबून असतात.

त्यामुळे दुष्काळात हा ओलावा नसल्यामुळे झाडांचे बाष्पोत्सर्जन कमी होईल आणि नदीचा प्रवाह स्थिर राहील. मात्र, प्रत्यक्षात ‘दुष्काळी विरोधाभास’ दिसून आला आहे. कडक उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात झाडे त्यांचे बाष्पोत्सर्जन कमी करण्याऐवजी ते कायम ठेवतात किंवा उलट वाढवतात. प्रिन्स्टन विद्यापीठातील पर्यावरण अभियंता रीड मॅक्सवेल आणि हॅरी स्टोन यांनी कोलोरॅडोमधील ‘ईस्ट रिव्हर’ पाणलोट क्षेत्रातील 200 एकर परिसरात सेन्सर्स लावले होते. त्यांनी 2023 (जास्त बर्फ, पण कोरडा उन्हाळा) आणि 2024 (मध्यम बर्फ, पण थंड उन्हाळा) अशा दोन वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला.

जेव्हा जमिनीतील वरचा ओलावा विक्रमी पातळीवर कमी होता, तेव्हाही झाडांमधील बाष्पोत्सर्जन प्रक्रिया उच्च पातळीवर होती. याचा अर्थ असा की, जेव्हा वरचे पाणी संपते, तेव्हा झाडे जमिनीतील खोलवरच्या भूजल साठ्यातून पाणी खेचतात. हे तेच पाणी आहे जे नैसर्गिकरीत्या झर्‍यावाटे नदीला जाऊन मिळणे अपेक्षित असते. हे संशोधन सुचवते की, जसजसे हवामान अधिक उष्ण आणि कोरडे होईल, तसतशी जंगले अधिक पाणी शोषतील. यामुळे नद्यांमधील पाणी कमी होईल. भविष्यात पाण्याचे नियोजन करताना केवळ पाऊस किंवा बर्फाचा विचार न करता झाडांच्या या ‘तहाने’चा देखील विचार करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT