पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यामध्ये गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना जरूर राबवल्या जातात. पण, त्यावर अनेक मर्यादा असल्याचे दिसून येते आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी भर दिवसा पेट्रोल पंपातून 34 लाख रुपयांची लूट झाल्याचे प्रकरण ताजे असताना रात्रीच्या वेळेस निवृत्त बँक व्यवस्थापकाच्या घरी लूटमार करताना चोरांनी वापरलेला अनोखा फंडा सध्या चर्चेत आला आहे.
रात्री उशिरा गुन्हेगारांनी पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक दीपेंद्रनाथ सहाय यांच्या घरावर दरोडा टाकला. यात त्यांनी घरातून दोन लाख रुपये रोख व 10 लाख रुपयांचे दागिने आणि चार मोबाईल्ससह पोबारा केला. कंकडबाग भागातल्या हाऊसिंग कॉलनीत दीपेंद्रनाथ सहाय राहतात. मंगळवारी रात्री उशिरा दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी घर लुटले.
रात्री 12.30च्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 5 दरोडेखोर घरात घुसले होते, तर चार दरोडेखोर घराच्या आवारात होते ते आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दीपेंद्रनाथ, त्यांची पत्नी आणि शेजारी सूरज हे सर्व जण आयपीएल मॅच पाहत असताना हे दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तिघांचेही हात-पाय बांधले. लूट करतानाच त्यांनी दीपेंद्रनाथ यांना मारपीट केली, तसेच चाकूने त्यांना जखमीही केले. हे सर्व सुमारे दोन तास सुरू होते. आश्चर्य म्हणजे यादरम्यान तिघांनाही बांधून ठेवल्यानंतर या चोरट्यांनी आयपीएलचा सामनाही पाहिला. त्या वेळी त्यांनी बाहेर आवाज जाऊ नये, यासाठी टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता. नंतर त्यांनी मुद्देमालासह पोबारा केला.
सहाय यांच्या घराची खिडकी सुदैवाने उघडी होती. त्यामुळे नंतर त्यांच्या ओरडण्याचा आवाज बाहेर गेला आणि शेजारच्यांना या गोष्टीचा पत्ता लागला. त्यांनी तातडीने घरात धाव घेतली आणि सहाय यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, तोवर चोर मुद्देमालासह तेथून सटकले होते.