जकार्ताः
इंडोनेशियाच्या बाली बेटावरील उलूवातू मंदिरात लांबसडक शेपटीची माकडे आहेत. ही माकडे बर्याच वेळा पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू उचलून नेतात आणि काही खाण्याची वस्तू मिळाली तर ती परत करतात. वस्तू परत करीत असतानाही ते फायद्याचा सौदा करतात असे आता दिसून आले आहे.
कॅनडाच्या लेथबि—ज युनिव्हर्सिटीतील जीन बेपटिस्ट लेका यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी व त्यांच्या काही सहकार्यांनी मंदिराच्या आसपास असलेल्या व्हिडीओ कॅमेर्यांमध्ये माकडांच्या हालचाली टिपून घेतल्या. त्यांनी माकडांकडून पर्यटकांच्या उचललेल्या वस्तू व त्या परत करण्यासाठीच्या 2200 प्रयत्नांचे विश्लेषण केले. जर माकडांना वस्तू परत करण्यासाठी खाऊचे आमीष दाखवले तर माकडे तसे करण्यापूर्वी आपल्या आवडीच्या पदार्थाला प्राधान्य देत असल्याचे आढळले. उदाहरणार्थ, काकडीऐवजी द्राक्षे दिल्यास ते लवकर वस्तू परत करीत असत. मंदिराच्या प्रशासनाने माकडांसाठी तीन प्रकारचे खाऊ ठेवले होते. त्यामध्ये कच्चे अंडे, बिस्किट आणि फळांचे पॅकेट यांचा समावेश होता. माकडांची पसंतीही वेगवेगळी असल्याचे यामधून दिसून आले. प्रौढ माकडांना तर कोणती वस्तू अधिक मौल्यवान आहे हेही कळते व अशाच वस्तूंची ते उचलेगिरी करतात. पाण्याची बाटली किंवा टोपीऐवजी ते मोबाईल फोन, कॅमेरा टॅबलेट, पर्ससारख्या वस्तू अधिक प्रमाणात उचलतात!