लंडन : माणसालाच भावभावना असतात असे काही नाही. अनेक प्राण्यांमध्ये भावनाशील वर्तन दिसून येत असते. नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत जिथंजिथं येते तिथंतिथं अनेकदा नात्यांमध्ये होणारे मतभेद, वादविवादही येतातच. हल्ली याच नात्यांमध्ये एकमेकांमध्ये असणारे हेच वाद, मतभेद ही नवी बाब राहिलेली नाही. अगदी वाद विकोपास जाऊन नात्यांमध्ये येणारा दुरावासुद्धा नवा नाही. पण, आश्चर्याची बाब म्हणजे मनुष्याप्रमाणं प्राण्यांमध्येही नात्यांमध्ये दुरावा येतो, हे माहितीये का तुम्हाला? पेंग्विन पक्ष्यांमध्येही जोडीदाराबरोबर असा दुरावा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
जवळपास दशकाभरापासून सुरु असणार्या एका निरीक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे. संशोधक आणि अभ्यासकांच्या मते 13 प्रजनन काळांमध्ये अर्थात ब्रिडिंग पिरिडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पेंग्विनच्या 37000 वस्त्यांमध्ये जोडीदाराला सोडण्याचं प्रमाण अधिक दिसून आलं. सहसा निराशाजनक प्रजनन काळानंतर पेंग्विनमध्ये हा बदल दिसून येतो. अहवालानुसार पेंग्विनमधील जोडीदाराला सोडण्याच्या या वर्तणुकीतून त्यांच्या गटाची प्रजननातील कामगिरी प्रभावित होते. ज्यामुळं वाईट प्रजनन काळानंतर पेंग्विन नव्या जोडीदाराचा शोध घेतात जेणेकरून भविष्यात प्रजनन प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणी येणार नाहीत. या निरीक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 1000 पेंग्विन जोड्यांपैकी 250 जोड्या विभक्त झाल्या होत्या. तर, काही मादी पेंग्विनच्या जोडीदाराचा मृत्यू झाला होता. निरीक्षणानुसार ज्या पेंग्विनचं आपल्या जोडीसोबतचं नातं अधिक काळासाठी टिकतं त्यांची प्रजनन क्षमता काळानुरूप वाढत जाते. पेंग्विनच्या काही प्रजातींवर नामशेष होण्याचाही धोका आहे. त्यामुळे त्यांचे असे वर्तन अधिकच धोकादायक ठरू शकते.