नवी दिल्ली : काही गोष्टींचे फायदे आणि तोटेही असतात. डार्क चॉकलेटचेही तसेच आहे. यामधून आपण 'अति सर्वत्र वर्जयेत' हेच लक्षात घ्यायचे असते. तुम्हालाही डार्क चॉकलेट खायला प्रचंड आवडत असेल तर आता आरोग्याची चिंता करायची गरज नाही. कारण नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की डार्क चॉकलेट केवळ तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करत नाही, तर तुमचा मेंदू तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या हृदयाची आणि मेंदूची काळजी घ्यायची असेल. तर तुम्हीही डार्क चॉकलेट बिनधास्त खाऊ शकता. मात्र, ते किती प्रमाणात खावे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच त्याचे आरोग्यावर होणारे वाईट परिणामही जाणून घेतले पाहिजे. चला तर पाहुयात डार्क चॉकलेटचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे.
अलीकडेच एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, आठवड्यातून एकदा तरी चॉकलेट खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतात. एका नवीन संशोधनात असेही आढळून आले आहे की चॉकलेटमध्ये असलेले पोषक तत्त्व चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. संशोधकांच्या मते, चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइडस्, पॉलिफेनॉल्स, मिथाईलक्सॅन्थाईन आणि स्टीरिक अॅसिड सारखे पोषक घटक जास्त प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब कमी करण्यास आणि सुरळीत रक्तप्रवाह राखण्यास मदत करतात. तसेच डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे रक्तदाब कमी करून तणावापासून आराम देतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो आणि तणावही कमी होतो.
डार्क चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंटस् त्वचेला सुरक्षित ठेवण्यास आणि संपूर्ण आरोग्य सद़ृढ ठेवण्यास मदत करतात. कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यात असलेल्या साखर आणि फॅटस्मुळे वजन वाढू शकते; ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.जेव्हा डार्क चॉकलेट तुम्ही कमी प्रमाणात खाता, तेव्हा तो संतुलित आहाराचा भाग बनतो.
डार्क चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंटस् हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात; पण डार्क चॉकलेटमध्ये असणार्या कॅलरीज, साखर व फॅटस् यांच्या प्रमाणाविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. डार्क चॉकलेटचे अतिसेवन केल्यामुळे वजन वाढू शकते; ज्यामुळे डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर ठरणे कमी होते. त्याशिवाय अॅलर्जी किंवा विशिष्ट औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डॉर्क चॉकलेटचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.