पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव म्युझियम हे जगातील सर्वात मोठं म्युझियम आहे. याचा प्रदर्शनी भाग जवळपास 73,000 वर्ग मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. हा भाग इतका मोठा आहे की, यात दहा फुटबॉल मैदानं सामावू शकतात. याच संग्रहालयात लिओनार्डो दा विंची याची अजरामर कलाकृती ‘मोनालिसा’ आहे. आता याच लुव म्युझियममध्ये चोरीची एक घटना समोर आल्यानंतर म्युझियम बंद करण्यात आलं आहे.
फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री राशिदा दाती यांनी एक्स (पूर्वीचे टि्वटर) वर एक पोस्टद्वारे सांगितलं की, ही चोरी रविवारी (19 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास म्युझियम उघडताना झाली. घटनास्थळाजवळ चोरी झालेला एक दागिना सापडला आहे, बहुतेक तो चोरीदरम्यान पडला असावा, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, ही नेमकी कोणती वस्तू होती, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
चोरीबाबत बोलताना मंत्री दाती म्हणाल्या की, ‘चोरांनी अगदी सफाईने काम केलं, कोणतीही भीती न बाळगता आणि हिंसा न करता.’ लूव्र जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलं जाणारं संग्रहालय आहे. या म्युझियममध्ये मोनालिसा पेंटिंगसह जगभरातील प्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती आणि बहुमुल्य खजिना प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. सकाळी म्युझियम सुरू होत असताना तीन मास्कधारी व्यक्ती तेथे दाखल झाले. फ्रान्सच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9च्या सुमारास काही लोकांनी खिडकी तोडून अपोलो गॅलरीतून आत प्रवेश केला.
ही गॅलरी सीन नदीकिनारी आहे आणि यात फ्रेंच क्राऊन ज्वेल्सचे उर्वरित अवशेष ठेवण्यात आले आहेत. गृहमंत्री लॉरेंट नुनेज म्हणाले, तीन-चार चोरांनी म्युझियमजवळ उभ्या ट्रकवरील फोर्कलिफ्टचा वापर केला. आत प्रवेश करून त्यांनी दागिने चोरून दुचाकीने पळ काढला. नुनेज यांच्यानुसार ही चोरी केवळ सात मिनिटात करण्यात आली. या चोरीत चोरट्यांनी कोण-कोणत्या वस्तू पळवल्या याचा तपास सुरू आहे. या वस्तूंना मोठं व्यावसायिक महत्त्व तर आहेच, परंतु ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वदेखील असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पोलिसांनी म्युझियम आणि त्यासमोरील नदीकिनारी असलेला रस्ता बंद केला आहे. तपास प्रामुख्याने इमारतीच्या आग्नेय कोपर्यावर केंद्रित आहे, हा भाग सीन नदीच्या दिशेने येतो.